‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स’च्या विमानांना अमेरिकेतही बंदी

वॉशिंग्टन/इस्लामाबाद – युरोपीय युनियननंतर अमेरिकेनेही ‘पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाईन्स’च्या (पीआयए) विमानांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या ४० टक्के वैमानिकांकडे बनावट लायसन्स असल्याचे खुद्द पाकिस्तानच्या नागरी उड्डयन मंत्र्यांनी संसदेत उघड केले होते. यानंतर जगभरात पाकिस्तानला नाच्चकी झाली आहे. पाकिस्तानच्या ‘पीआयए’च्या विमानांच्या उड्डाणांना घेऊन जगभरात सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केल्या जात आहेत. याआधी युरोपीय युनियन व्यतिरिक्त आठ देशांनी ‘पीआयए’ची उड्डाणे रद्द केली आहेत. आता अमेरिकने ‘पीआयए’च्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालून पाकिस्तानला दणका दिला आहे.

'पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाईन्स'च्या विमानांना अमेरिकेतही बंदीमे महिन्यात पाकिस्तानच्या कराची शहरात झालेल्या विमान अपघातासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत माहिती देत असताना नागरी उड्डयन मंत्र्यांनी दिलेल्या धक्कदायक माहितीने पाकिस्तानच्या व्यवस्थेचेच वाभाडे काढले. ४० टक्के वैमानिक बनावट परवाना घेऊन काम करीत असल्याची महिती देऊन मंत्री गुलाम सरवर खान यांनी खळबळ माजविली. त्यानंतर सुरक्षेला घेऊन जगभरातील देश आता ‘पीआयए’च्या विमानांच्या उड्डणांवर बंदी आणत आहेत. युरोपीय युनियनने आपल्या ३२ सदस्य देशांना तशा सूचना केल्या. त्याचवेळी ब्रिटन, व्हिएतनाम, मलेशिया, कुवेत, इराण, जॉर्डन आणि युएईने ही पाकिस्तानच्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी आणली आहे.

युरोपीय युनियनने घातलेल्या बंदीमुळेच पाकिस्तानच्या ३३ अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान उचलावे लागणार आहे. यामुळे युरोपीय युनियनने हे निर्बंध मागे घ्यावेत यासाठी पाकिस्तान जोरादार प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच बंदी घातलेल्या इतर देशांशीही पाकिस्तानने बंदी मागे घेण्यासाठी चर्चा सुरु केली होती. मात्र ‘पीआयए’वर बंदी घालणाऱ्या देशांची यादी लांबतच चालली आहे. अमेरिकेच्या फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशनने (एफएए) पाकिस्तानच्या वैमानिकांना मिळालेल्या प्रमाणपत्राबाबत चिंता व्यक्त केली आहे.

अधिच तोट्यात असलेली ‘पीआयए’ यामुळे अधिकच तोट्यात गेली आहे. ‘पीआयए’वरील बंदीनंतर ब्रिटन आणि पाकिस्तान दरम्यान इतर विमान कंपन्यांचे तिकीट दार ३०० टक्क्यांनी वाढल्याच्या बातम्या आहेत. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानात इम्रान खान सरकार आणि त्यांच्या मंत्री महोदयांवर जोरदार टीका सुरु आहे. बनावट परवानाधारक वैमानिकांची माहिती उघड करून पाकिस्तानची प्रतिष्ठा या सरकारने आणखीनच धुळीस मिळवल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानच्या वैमानिकांची डिग्री खोटी असल्याचे दावे करणाऱ्या मंत्र्यांचीच डिग्री खोटी असल्याचे आरोप केले होते. तसेच ‘पीआयए’ची संप्पती विकण्याचा, त्यांचे खाजगीकरण करण्यासाठी हा घाट घालण्यात असल्याचा आरोपही भुट्टो यांनी लावला होता.

leave a reply