पाकिस्तान हे तालिबानचे दुसरे घर

- तालिबानच्या प्रवक्त्याची जाहीर कबुली

काबुल – पाकिस्तान हे तालिबानचे दुसरे घर आहे, असे तालिबानच्या प्रवक्त्याने जाहीर करून टाकले. आपल्या या दुसऱ्या घरात काहीही विपरित घडू देणार नाही, अशी ग्वाही देखील तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने दिली. पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुजाहिद याने केलेला हा दावा पाकिस्तानला अडचणीत टाकणारा ठरतो आहे. तालिबानची पाकिस्तानबरोबरील जवळीक हा आंतरराष्ट्रीय टीकेचा तसेच पाकिस्तानातील बुद्धिमंतांच्या चिंतेचा विषय बनलेला आहे. पाकिस्तानच्या धार्मिक-शैक्षणिक संस्थांवर तालिबानचे झेंडे फडकविले जात आहेत. यामुळे पाकिस्तानचे तालिबानीकरण होऊ लागल्याचे समोर येत असून याचे विदारक परिणामही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत झबिहुल्ला मुजाहिद याने पाकिस्तान तालिबानचे दुसरे घर असल्याचे सांगून खळबळ माजविली आहे.

गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर त्याचा जल्लोष पाकिस्तानात साजरा झाला. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे प्रमुख हमिद गुल यांचा जुना व्हिडिओ या निमित्ताने पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला होता. पाकिस्तान अमेरिकेला अफगाणिस्तानात अमेरिकेच्याच सहाय्याने पराभूत करील, असे गुल म्हणाले होते. त्याचा दाखला देऊन तालिबानच्या या विजयामागे पाकिस्तानच असल्याचे दावे छातीठोकपणे केले जात होते. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानच्या राजवटीला मान्यता द्यावी, यासाठी पाकिस्तानचे सरकार धडपड करीत आहे.

एकीकडे तालिबानबरोबरील संबंध नाकारणारे पाकिस्तानचे सरकार दुसऱ्या बाजूला तालिबानला सर्वतोपरी सहाय्य पुरवित आहे, याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. तालिबानला शस्त्रास्त्रे, पैसे आणि लष्करी सहाय्य पुरविणाऱ्या पाकिस्तानात पाश्‍चिमात्य देशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत झबिहुल्ला मुजाहिदीने पाकिस्तानच्याच वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन या देशाचे पितळ उघडे पाडले.

पाकिस्तान म्हणजे दुसरे घर असल्याचे सांगून तालिबानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची कोंडी केल्याची नाराजी पाकिस्तानी नेते, विश्‍लेषक करीत आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबान पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणांवर हल्ले चढविणाऱ्या तेहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांवर तलिबानी कारवाई करतील, अशी अपेक्षा पाकिस्तानात व्यक्त केली जात होती. यासाठी पाकिस्तानने ‘तेहरिक’च्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची यादी तालिबानला दिली होती. पण तालिबानने त्यांच्यावर कारवाई करण्याचे नाकारून पाकिस्तानला तोंडघशी पाडल्याची टीका होत आहे.

याशिवाय तालिबानच्या प्रवक्त्याने ओसामा बिन लादेनबाबत केलेले विधान देखील पाकिस्तानातील काही राजकीय विश्‍लेषकांना चिंतेत टाकत आहे. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याने अमेरिकेवर 9/11चा हल्ला घडविला याचा कुठलाही पुरावा नसल्याचे मुजाहिद म्हणाला. त्यामुळे अल कायदा व लादेनबाबत 20 वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या भूमिकेवर तालिबान आजही ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वर्षभरापूर्वी देशाच्या संसदेमध्ये ओसामा बिन लादेन शहीद असल्याचे विधान केले होते. या साऱ्या गोष्टींची आंतरराष्ट्रीय समुदाय दखलघेत आहे. विशेषतः पाकिस्तानच्या तालिबानबरोबरील सहकार्याकडे अमेरिकेची वक्रदृष्टी पडली आहे आणि लवकरच याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असा इशारा विश्‍लेषक देत आहेत. अमेरिकेचे माजी लष्करी व राजनैतिक अधिकारी पाकिस्तानला धडा शिकविण्याची उघडपणे मागणी करू लागले आहेत. कारण अफगाणिस्तानात अमेरिकेच्या विरोधात तालिबानला मिळालेल्या यशामागे पाकिस्तानचा विश्‍वासघात असल्याचे अमेरिकेच्या माजी लष्करी व राजनैतिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने आपल्या दुसऱ्या घराची माहिती उघड करून या आरोपाला दुजोरा दिल्याचे दिसते.

leave a reply