पाकिस्तान तालिबानची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे

- अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांचा आरोप

काबुल – ‘पाकिस्तानचे राजनैतिक अधिकारी तालिबानची काल्पनिक प्रतिमा उभी करून ती सजविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. पण प्रत्यक्षात तालिबान 2.0 (दुसर्‍यांदा अफगाणिस्तानची सत्ता घेऊ पाहत असलेली तालिबान) अल कायदा आणि आयएस-खोरासन या दहशतवादी संघटनांइतकीच क्रूर आहे’, असा घणाघात अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी केला. दोन दिवसांपूर्वी सालेह यांनी पाकिस्तानचे हवाईदल तालिबानला संरक्षण पुरवित असल्याचा आरोप करून खळबळ माजविली होती.

पाकिस्तान तालिबानची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे - अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांचा आरोपगेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानचे नेते तालिबानची चांगली प्रतिमा चितारण्याचा प्रयत्न करीत आहेत. अफगाण तालिबान बदलली असून ते राजकीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी तयार असल्याचा दावा पाकिस्तान करीत आहे. अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी तालिबानच्या प्रतिमा उभारणीसाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना लक्ष्य केले. तसेच, ‘‘पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांमध्ये ‘चांगले आणि वाईट’ असा फरक करीत आहे. पाकिस्तानसाठी चांगले असणारे ‘लश्कर-ए-तोयबा’चे दहशतवादी या देशाचे निष्ठावान सहकारी आहेत’’, असा ठपका सालेह यांनी ठेवला.

पाकिस्तानचे लष्कर आणि तालिबानमध्ये असलेल्या सहकार्याचा पर्दाफाश होत आहे. अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्दाक सीमेचा ताबा घेणार्‍या तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे जवान असल्याचे फोटोग्राफ्स समोर येत आहेत.

leave a reply