कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्तानी सरकारचा मोठा निर्णय – सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी दिली

इस्लामाबाद – भारतीय हेर असल्याचा आरोप करून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावणार्‍या पाकिस्तानने आता त्यांना न्यायालयात दाद मागण्याची परवानगी दिली. यासाठी पाकिस्तानच्या संसदेत ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर पाकिस्तानच्या संसदेत मोठा गदारोळ माजला. या प्रश्‍नावर पाकिस्तानचे सरकार व विरोधी पक्ष एकमेकांवर गंभीर आरोप करीत आहेत. सध्या पाकिस्तानचे सरकार व लष्कर भारताला शांतता व चर्चेचे प्रस्ताव देत आहेत. अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य माघार?घेत असताना, पाकिस्तानचे तालिबानबरोबरोबरील संबंध बिघडले आहेत. यामुळे अफगाणिस्तानच्या सीमेबरोबरच पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेला फार मोठे आव्हान मिळू शकेल. त्याचवेळी पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. अशा परिस्थितीत भारताबरोबर चर्चा करून पाकिस्तान आपली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढवू शकतो. यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. पाकिस्तानच्या संसदेत कुलभूषण जाधव यांच्याबाबत मंजूर झालेला ठराव, हा देखील पाकिस्तानच्या याच प्रयत्नांचा भाग ठरतो.

कुलभूषण जाधवकुलभूषण जाधव यांचे इराणच्या सीमेतून दहशतवाद्यांमार्फत अपहरण करून त्यांना पाकिस्तानात आणण्यात आले होते. ते भारताचे हेर असल्याचा दावा करून त्यांनी बलोचिस्तानमध्ये घातपात घडविल्याचा आरोप पाकिस्तानने ठेवला होता. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षाही ठोठावली होती. पण याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागणार्‍या भारताला फार मोठे यश मिळाले. कुलभूषण जाधव यांच्यावरील कारवाई अवैध ठरते, असे सांगून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना वकिली सहाय्य पुरविण्याचे आदेश पाकिस्तानला दिले होते.

बराच काळ पाकिस्तानने या आदेशाची अंमलबजावणी केली नव्हती. पण आता भारताबरोबरील संबंध सुधारण्याची गरज वाटू लागल्याने पाकिस्तानच्या सरकारने आपल्या संसदेत जाधव यांच्याबाबतचा ठराव मंजूर केला. या ठरावामुळे जाधव यांना आपल्या विरोधातील अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागता येईल. भारताने या निर्णयाचे स्वागत केले. पण जाधव यांना भारतीय वकिल मिळाला नाही किंवा आवश्यक ते इतर कायदेशीर संरक्षण मिळाले नाही, तर पाकिस्तानच्या संसदेतील या ठरावाला काडीचाही अर्थ नसेल, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे.

या प्रश्‍नावर पाकिस्तानच्या संसदेत मोठा गदारोळ झाला. कुलभूषण जाधव यांच्या विरोधात कठोर कारवाई करीत नसल्याचा आरोप करून त्यावेळचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर इम्रान?खान यांनी सडकून टीका केली होती. यासाठी नवाझ शरीफ यांची गद्दार म्हणून संभावना करणार्‍या इम्रान?खान यांना आता शरीफ यांच्या पक्षाचे नेते त्याच भाषेत उत्तर देत आहेत. त्यावेळी आमच्या नेत्यांवर गद्दारीचे आरोप करणारे इम्रान?खान आता जाधव यांच्याबाबत असा ठराव कसा काय मांडू शकतात, असा जाब विरोधी पक्षांकडून विचारला जात आहे.

leave a reply