काश्मीरबाबत भारताला दिलेल्या प्रस्तावावरून पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर कट्टरपंथियांचे टीकास्त्र

इस्लामाबाद – भारताने जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 पुन्हा लागू केल्याखेरीज पाकिस्तान भारताशी चर्चा करणार नाही, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते. पण आता इम्रान खान भारताशी चर्चा करण्यासाठी मवाळ सूर लावत असल्याची टीका पाकिस्तानात सुरू झाली आहे. भारताने कलम 370 हटविण्याच्या आधीची स्थिती प्रस्थापित करण्यासाठी आराखडा द्यावा, त्यानंतर पाकिस्तान भारताशी चर्चा करील, असे इम्रान खान यांनी म्हटले होते. त्यानंतर पाकिस्तानचे कट्टरपंथिय विश्‍लेषक इम्रान खान काश्मीरचा सौदा करायला तयार झाल्याची जोरदार टीका करू लागले आहेत.

कट्टरपंथियगेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानच्या सरकारला भारताशी चर्चा सुरू करण्याची आवश्यकता भासत आहे. पाकिस्तानचे लष्करच आपल्या सरकारला या चर्चेसाठी पुढाकार घेण्यास भाग पाडत असल्याचे बोलले जाते. मात्र आधीच्या काळात भारताच्या विरोधात स्वीकारलेली अतिआक्रमक भूमिका पंतप्रधान इम्रान?खान यांच्या मार्गातील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. कलम 370 लागू करून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिल्याखेरीज भारताशी चर्चा शक्य नसल्याचा दावा करून इम्रान खान यांनी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला, अशी टीका काही पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत. पण आता ही चूक दुरूस्त करण्यासाठी इम्रान खान करीत असलेल्या हालचाली पाकिस्तानातील कट्टरपंथियांना मान्य नाहीत.

एकाच दिवसापूर्वी इम्रान खान यांनी भारताने जम्मू व काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आराखडा मांडण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मिळाल्यास पाकिस्तान भारताशी चर्चा करायला तयार होईल, असे इम्रान खान म्हणाले होते. त्यावर कट्टरपंथिय विश्‍लेषकांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान इम्रान खान काश्मीरबाबतची भूमिका हळूहळू मवाळ करीत चालले आहेत आणि हे सारे ते भारताशी चर्चा करण्यासाठीच करीत असल्याचा आरोप या कट्टरपंथिया विश्‍लेषकांनी केला.

भारताशी चर्चा केल्याखेरीज पाकिस्तानला भवितव्य नाही, असा इशारा या देशातील जबाबदार पत्रकार फार आधीपासून देत होते. पण इम्रान खान यांच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता आर्थिक आघाडी, अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर झालेली कोंडी, अंतर्गत समस्या, चीनची नाराजी व सौदी आणि आखाती देशांचे असहकार्य यामुळे पाकिस्तानची पुरती दैना उडाल्याचे दिसत आहे. म्हणूनच भारताबरोबर चर्चा करून पाकिस्तानच्या सरकार व लष्कराला आपल्या देशात स्थैर्य प्रस्थापित करायचे आहे. त्याचबरोबर भारताशी चर्चा करून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरील विश्‍वासार्हताही वाढवायची आहे. मात्र चर्चेसाठी पाकिस्तानच्या अटी मान्य करण्यास भारत तयार नाही, त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारची मोठी पंचाईत झालेली आहे.

leave a reply