पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानला अंतरिम प्रांत घोषित करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली/इस्लामाबाद – भारताच्या काश्मीरचाच भाग असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानला आपला प्रांत घोषित करण्याची तयारी पाकिस्तानने केली आहे. भारताने कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर, त्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान स्थानिकांचा विरोध डावलून हा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते. भारत सरकार लवकरच पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) ताब्यात घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याची चिंता पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी व सामरिक विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. या चिंतेने ग्रासलेला पाकिस्तान ‘पीओके’सह गिलगिट-बाल्टिस्तानचा बचाव करण्यासाठी धडपडत असल्याचे यामुळे समोर आले आहे.

पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानला अंतरिम प्रांत घोषित करण्याच्या तयारीतभारतातील पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बसित यांनी ‘पीओके’ ताब्यात घेण्यासाठी भारत आक्रमक निर्णय घेणार असल्याचे दावे केले. ‘पीओके’मध्ये मूळ असलेल्या व सध्या परदेशात वास्तव्य करणार्‍यांना भारतीय नागरिकत्त्व देण्याची तयारी भारताच्या सरकारने केली आहे, असा दावा अब्दुल बसित यांनी केला. इतकेच नाही, तर जम्मू व काश्मीरला राज्याचा दर्जा देऊन याच्या विधानसभेत ‘पीओके’ला प्रतिनिधित्त्व देण्याची तयारीही भारताने केल्याचे बसित यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर ‘पीओके’मधील जनतेच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी भारत सरकारने जम्मू व काश्मीरमध्ये प्रशासकीय सोयीसुविधा उभारण्याची तयारी केली आहे, असे बसित यांचे म्हणणे आहे.

याच्या बरोबरीने फ्रान्ससारख्या आपल्या निकटतम मित्रदेशाने जम्मू व काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दूतावास सुरू करावा, असा आग्रह भारताने धरला आहे. भारताची ही पावले पाकिस्तानला हादरविणारी आहेत. एकदा का यात भारताला यश मिळाले, तर पाकिस्तानला आपल्या ताब्यातील काश्मीर अर्थात ‘पीओके’ला अखेरचा निरोप द्यावा लागेल, असा इशारा माजी राजदूतांनी आपल्या सरकारला दिला. हे टाळायचे असेल, तर भारताची पावले लक्षात घेऊन त्याविरोधात खबरदारीची उपाययोजना आत्तापासूनच सुरू करायला हवी, असे अब्दुल बसित यांनी बजावले आहे. त्यानंतर गिलगिट-बाल्टिस्तानला आपला अंतरिम प्रांत घोषित करण्याच्या प्रक्रियेला पाकिस्तानने वेग दिल्याच्या बातम्या आल्या आहेत.

‘काश्मीरच्या प्रश्‍नावर भारताला रोखण्यात पाकिस्तानचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. भारताला एकाकी पाडण्याऐवजी काश्मीरच्या प्रश्‍नावर पाकिस्तानच आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडल्याचे दिसत आहे’, अशी टीका पाकिस्तानी माध्यमे व विश्‍लेषक करीत आहेत. तर पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताबरोबर ‘काश्मीरचा सौदा’ केल्याचा ठपका ठेवत आहेत. अशा परिस्थितीत ‘पीओके’मध्ये पार पडलेल्या निवडणुकीवरून नवा वाद माजला आहे. या निवडणुकीत पाकिस्तानच्या लष्कराने इम्रान खान यांच्या सत्ताधारी पक्षाला विजयी करण्यासाठी गैरव्यवहार केला, अशी जोरदार टीका सुरू झाली आहे. यावर इम्रान?खान यांचे समर्थकही नाराजी व्यक्त करीत असून याचा लाभ भारताला मिळेल, अशी चिंता व्यक्त करीत आहेत. तर भारताने मात्र पीओकेमधील निवडणूक घेण्याचा अधिकारच पाकिस्तानला नसल्याचे सांगून पाकिस्तानने भारताचा हा भूभाग खाली करावा, असा इशारा दिला आहे.

भारताच्या या इशार्‍याचे पडसाद पाकिस्तानात उमटले आहेत. लवकरच भारत पीओके ताब्यात घेण्यासाठी हल्ला चढविणार असल्याचे दावे भारतद्वेष्टे विश्‍लेषक करीत आहेत. त्याचवेळी माजी राजदूत अब्दुल बसित यांच्यासारखे मुत्सद्दी भारत राजनैतिक पातळीवर पीओके मिळविण्यासाठी हालचाली करून पाकिस्तानची कोंडी करीत असल्याचा इशारा देऊ लागले आहेत. याने भेदरलेले पाकिस्तानचे सरकार ‘पीओके’मधील जनता पाकिस्तानच्या विरोधात आणि भारताच्या बाजूने घोषणा देत असताना, व गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये असंतोषाचे वातावरण असूनही, या भागाला आपला अंतरिम प्रांत घोषित करण्याची घोडचूक करीत आहे.

leave a reply