पाकिस्तानला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागेल

- अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह

मानहानीकारककाबुल/जेरूसलेम – तालिबानच्या विरोधात अफगाणिस्तानच्या जनतेने जीवाची पर्वा न करता केलेल्या निदर्शनांचे अमरुल्ला सालेह यांनी स्वागत केले. अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये तालिबानच्या विरोधात नॉर्दन अलायन्सची आघाडी उघडणारे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी तालिबानच्या विरोधात घनघोर संघर्ष पुकारण्याची घोषणा केली आहे. तसेच तालिबानची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानलाही सालेह यांनी खरमरीत इशारा दिला. ‘पाकिस्तान आणि तालिबान आपल्या हिंसक कारवायांनी अफगाणिस्तान गिळंकृत करू शकत नाहीत. असा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला इतिहासातील सर्वात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागेल’, असे सालेह यांनी बजावले आहे.

सालेह यांनी तालिबानविरोधात पुकारलेल्या लष्करी संघर्षाला अफगाणिस्तानातून प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून तालिबानच्या हल्ल्यांमुळे माघार घेतलेले अफगाणी जवान पंजशीरमध्ये रणगाडे व लष्करी वाहनांसह सालेह यांच्या नेतृत्वाखाली दाखल होत आहेत. पंजशीरचे प्रमुख व नॉर्दन अलायन्सचे माजी नेते अहमद शहा मसूद यांचा मुलगा अहमद मसूद याने देखील सालेह यांच्याबरोबरीने तालिबानविरोधी संघर्षाची घोषणा केली. यासाठी अमेरिकेने नॉर्दन अलायन्सला शस्त्रास्त्रे पुरवावी, अशी मागणी अहमद मसूद यांनी केली आहे.

मानहानीकारक‘माझे वडिल अहमद शाह मसूद यांनी तालिबानविरोधात लढा दिला. मी देखील त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवणार आहे. या तालिबानविरोधी संघर्षात नॉर्दन अलायन्सला शस्त्रास्त्रे पुरवून अमेरिका अजूनही लोकशाहीचा समर्थक असल्याचे दाखवून देऊ शकतो’, असे मसूद यांनी अमेरिकी वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. सालेह आणि मसूद यांच्या नेतृत्वाखाली पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सची मोठी फळी तयार झाल्याचा दावा केला जातो.

अफगाणिस्तानचे माजी संरक्षणमंत्री बिस्मिल्ला मोहम्मदी हे देखील सालेह यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करण्यासाठी पंजशीरमध्ये दाखल झाल्याचा दावा केला जातो. तर अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि ‘मझार-ए-शरीफ’चे संरक्षक म्हणून ओळखले जाणारे कडवे तालिबानविरोधी नेते रशिद खान दोस्तम हे देखील लवकरच पंजशीरमध्ये दाखल होऊ शकतात, असे बोलले जाते.

गेल्या आठवड्यात तालिबानच्या दहशतवाद्यांनी मझार-ए-शरीफचा ताबा घेतल्यानंतर दोस्तम हे अट्टा मोहम्मद नूर या आणखी एका टोळीप्रमुखासह उझबेकिस्तानमध्ये निघून गेले होते. यामुळे सालेह, मसूद, दोस्तम, मोहम्मंदी, नूर यांच्यासारखे प्रखर तालिबानविरोधी नेते नॉर्दन अलायन्समध्ये एकत्र येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply