पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानातून येणाऱ्या निर्वासितांवर बेछूट गोळीबार

- तीन अफगाणी नागरिकांचा बळी

काबुल/इस्लामाबाद – काबुल विमानतळावरील भीषण स्फोटांनंतर जीवाच्या भीतीने पाकिस्तानच्या सीमेकडे धाव घेणाऱ्या अफगाणी नागरिकांवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात तिघांचा बळी गेला. पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईमुळे अफगाणींचा जीव टांगणीला लागला आहे. अफगाणी निर्वासितांवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करावर आंतरराष्ट्रीय स्तरातून सडकून टीका होत आहे.

पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानातून येणाऱ्या निर्वासितांवर बेछूट गोळीबार - तीन अफगाणी नागरिकांचा बळीदोन दिवसांपूर्वी तालिबानने अफगाणींना देश सोडून जाता येणार नसल्याचे फर्मान काढले. त्याचबरोबर काबुल विमानतळाकडे जाणारे सर्व मार्ग तालिबानच्या दहशतवाद्यांनी बंद केले. गुरुवारी संध्याकाळी काबुल विमानतळावरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अफगाणी जनता अधिकच भेदरली. काबुल विमानतळाचा मार्ग बंद झाल्यामुळे हजारो ते लाखोंच्या संख्येने अफगाणी नागरिक शेजारच्या पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तानच्या सीमेजवळ धडकत आहेत.

अशाच हजारो निर्वासितांचा जत्था अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्दाकद्वारे पाकिस्तानच्या चमन सीमेजवळ दाखल झाला होता. या निर्वासितांनी पाकिस्तानी लष्कराकडे सीमा खुली करण्याची मागणी केली. पण पाकिस्तानच्या लष्कराने चमन सीमा बंद करून या निर्वासितांची कोंडी केली. पण जीवावर उदार झालेल्या काही अफगाणींनी येथील कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन अफगाणींचा बळी गेला तर पाच जखमी झाले. कितीतरी तास अफगाणी नागरिकांचे मृतदेह चमन सीमेवरच पडलेले होते.

पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सीमेवरील तणावाबाबत सांगताना, सारे काही ठिक असल्याची प्रतिक्रिया दिली. पण चमन सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात अफगाणींचा बळी गेल्याच्या मुद्याकडे इफ्तिखार यांनी दुर्लक्ष केले. पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईवर जगभरातून टीका होत आहे. युरोपमधील अफगाणी तसेच पाकिस्तानी वंशाचे नागरिक पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईवर ताशेरे ओढत आहेत.

तालिबानच्या राजवटीमुळे भेदरलेल्या अफगाणी जनतेला शेजारी देशांनी आश्रय द्यावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी केले होते. यानंतर पाकिस्तानच्या सरकारने अफगाणींसाठी सीमा खुली केल्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात पाकिस्तानने सीमा बंद करून अफगाणींची कोंडी केल्याचा आरोप होत आहे.

leave a reply