पुलवामा कटात सहभागी असलेला ‘जैश’चा पाकिस्तानी कमांडर लंबू जम्मू-काश्मीरमधील चकमकीत ठार

पुलवामाश्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू सैफुल्लाह उर्फ लंबूला चकमकीत ठार करण्यात आले. भारतात घुसखोरी केल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून काश्मीरमध्ये सक्रीय असलेला लंबू कित्येक दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता. लंबू केवळ जैशचा कमांडर नव्हता, तर तो ‘जैश’चा प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा नातेवाईक होता. तसेच त्याने अफगाणिस्तानात तालिबानबरोबरही नाटो सैन्याविरोधात दहशतवादी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे लंबू चकमकीत ठार झाल्याने सुरक्षादलांना फार मोठे यश मिळाले आहे. लंबूचा खात्मा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांसाठी मोठा झटका मानला जातो.

पुलवामाच्या नामिबियन आणि मरसार या जंगल क्षेत्रात सुरक्षादलांनी संयुक्त शोध मोहिम हाती घेतली होती. या जंगल क्षेत्रात काही दहशतवादी लपल्याची सूचना सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानंतर हे ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षादलांच्या जवानांचा आमनासामना झाला. जवानांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ज्या भागात ही शोध मोहिम हाती घेण्यात आली होती, तो भाग अतिशय दुर्गम अशा ठिकाणी अशी मोहिम राबविणे कठीण बाब होती, अशी माहिती मिळत आहे.

सुमारे पाच तास चाललेल्या या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटण्यास फार वेळ लागला नाही. सैफुल्लाह उर्फ लंबू उर्फ अदनान उर्फ इस्लाम अल्वी असे ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असल्याची माहिती लष्कर आणि पोलिसांकडून देण्यात आली. सहा फुटाहून जास्त उंच असल्याने सैफुल्लाहला लंबू नावाने ओळखले जात होते. वाहनांमध्ये आयईडी बसविण्यात तो तज्ज्ञ मानला जातो. घुसखोरी करून भारतात दाखल होण्याआधी त्याने तालिबानबरोबरही अफगाणिस्तानात तैनात नाटो सैन्याविरोधात कारवाया केल्या आहेत.

पुलवामा2019 साली पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने पाकिस्तानात हवाई कारवाई करून जैशचे तळ उद्ध्वस्त केले होते. पुलवामा हल्ल्यात स्फोटकाने भरलेल्या वाहनात बसविण्यात आलेला आयईडी लंबूनेच तयार केला होता, अशी माहिती सुरक्षादलांनी दिली आाहे. पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी काही दहशतवाद्यांना या आधीच ठार करण्यात आले होते. मात्र लंबू फरार होता. पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी 19 दहशतवाद्यांपैकी आतापर्यंत सात जणांना ठार करण्यात आले आहे. तर सात जणांना अटक करण्यात आली असून पाच जण अजून फरार आहेत.

2017 साली लंबू घुसखोरी करून भारतात दाखल झाला. येथे तरुणांना दहशतवादी संघटनेमध्येही सामील करून घेण्याचे काम करीत होता. गेल्या तीन वर्षात काश्मीर खोर्‍यात झालेल्या काही हल्ल्यांमध्येही लंबूचा सहभाग होता. लंबूबरोबर चकमकीत ठार झालेला दहशतवादी स्थानिक असल्याचे व त्याचे नाव आदील असल्याची माहिती लष्करातर्फे देण्यात आली. चकमकीच्या ठिकाणावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चिनी बनावटीची पिस्तूल, दोन एके-47 राफयलचा समावेश आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षात आतापर्यंत 89 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही 200 दहशतवादी सक्रीय आहेत. पण तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच यावर्षात एकही पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी ठरलेला नाही, अशी माहिती लष्कराच्या 15 कोरचे लेफ्टनंंट जनरल डी.पी. पांडे यांनी दिली.

leave a reply