अफगाणी निर्वासितांवर पाकिस्तानी लष्कराची कारवाई

काबुल – स्पिन बोल्दाक-चमन सीमेवर पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या निर्वासितांवर कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या लष्कराने सीमा बंद केल्यामुळे एका अफगाणी नागरिकाचा बळी गेला. यामुळे भडकलेल्या अफगाणींनी पाकिस्तानी लष्करावर दगडफेक केली.

अफगाणी निर्वासितांवर पाकिस्तानी लष्कराची कारवाईतालिबानच्या क्रूर कारवाईमुळे घाबरलेले अफगाणी हजारोंच्या संख्येने शेजारी देशांकडे आश्रयासाठी धाव घेत आहेत. या अफगाणी निर्वासितांना आपल्या देशात आश्रय द्या, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे. पाकिस्तानचे सरकार उघडपणे चमन सीमा खुली केल्याचे सांगत असला तरी प्रत्यक्षात ही सीमा बंद करून पाकिस्तानने हजारो अफगाणींची कोंडी केलेली आहे.

याआधीच तालिबानला सहाय्य करणाऱ्या पाकिस्तानवर अफगाणी जनता संतापलेली असल्याचे अफगाणी पत्रकार पाकिस्तानी माध्यमांमधून सांगत आहेत. त्यात पाकिस्तानने सीमा बंद केल्यामुळे अफगाणी जनतेचा हा संताप शिगेला पोहोचू शकतो, असा इशारा अफगाणी पत्रकार देत आहेत.

leave a reply