अफगाणिस्तानच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानी लष्करी अधिकारी ठार

हेल्मंड – अफगाणिस्तानच्या हवाईदलाने तालिबान आणि अल कायदाच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी ठार झाला आहे. अफगाणी वर्तमानपत्राने ही माहिती दिली. पण पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी दहशतवाद्यांच्या तळावर काय करीत होता, हे कळू शकलेले नाही.

अफगाणिस्तानच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानी लष्करी अधिकारी ठारहेल्मंड प्रांताच्या खान नेशिन जिल्ह्यातील पोपाल्झाई भागात अफगाणी हवाईदलाने कारवाई केली होती. येथील तालिबान आणि अल कायदाच्या ठिकाणांवर चढविलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी जखमी झाला होता. या अधिकार्‍यावर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण हा अधिकारी वाचू शकला नाही, असे अफगाणी वर्तमानपत्राने म्हटले आहे.

अफगाणिस्तानच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानी लष्करी अधिकारी ठारदरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब यांनी या प्रकरणी पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका केली. या महिन्याच्या सुरुवातीला नांगरहार प्रांतातील एका सभेत मोहिब यांनी अफगाणिस्तानातील दहशतवाद आणि अस्थैर्याला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच पाकिस्तान दहशतवाद्यांचे वेश्यागृह बनले आहे, अशी जळजळीत टीका मोहिब यांनी केली.

मोहिब यांच्या या टीकेवर पाकिस्तानने संताप व्यक्त केला आहे. यापुढे पाकिस्तान मोहिब यांच्याबरोबर माहितीची देवाणघेवाण करणार नाही, असे पाकिस्तानने अफगाणी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांना कळविल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानचे लष्कर तालिबानच्या हक्कानी नेटवर्कच्या तळांवर कारवाई करीत नसल्याचा अफगाणिस्तानचा आरोप आहे. अमेरिकेच्या सैन्यमाघारीआधी पाकिस्तानने तालिबानविरोधात प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी अफगाण सरकारचे माध्यमप्रमुख दवा खान यांनी केली आहे.

leave a reply