पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारताच्या सुरक्षा सल्लागारांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न

लक्ष्यनवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी संघटना हालचाल करीत असल्याचे उघड झाले आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ने यासाठी ‘लश्कर-ए-मुस्तफा’ नावाचा स्वतंत्र गट तयार केला होता. हे सारे पाकिस्तानच्या इशार्‍यानेच केले जात असल्याचे संकेत मिळत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या एका दहशतवाद्याकडून या कटाची माहिती उघड झाली. यामुळे पाकिस्तान भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे दावे निकालात निघाले आहेत.

Advertisement

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी आपला देश भारताबरोबर शांतता व सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते. मात्र यासाठी पाकिस्तान घेत असलेला पुढाकार म्हणजे आमचा कमकुवतपणा मानला जाऊ नये, असेही जनरल बाजवा पुढे म्हणाले. त्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही भारताबरोबर चर्चेची तयारी दाखविली होती. भारताने चर्चेसाठी एक पाऊल उचलले तर पाकिस्तान दोन पावले पुढे येऊन त्याला प्रतिसाद देईल, असे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते. मात्र भारताबरोबर चर्चेचे नाटक करीत असताना, दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान आखण्याची या देशाची परंपरा अजूनही कायम राखली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

६ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर पोलिसांनी हिदायतुल्लाह मलिक नावाच्या दहशतवाद्याला ताब्यात घेतले. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने स्थापन केलेल्या ‘लश्कर-ए-मुस्तफा’ या गटाचा हिदायतुल्लाह प्रमुख मानला जातो. त्याची कसून चौकशी करण्यात आली व त्यातून धक्कादायक माहिती हाती लागली आहे. २०१९ च्या मे महिन्यात हिदायतुल्लाह मलिक विमानाने नवी दिल्लीत आला होता. यावेळी त्याने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे कार्यालय असलेल्या सरदार पटेल भवनच्या इमारतीची पाहणी केली. तसेच या इमारतीचा व्हिडिओ देखील त्याने बनविला होता.

इतकेच नाही तर डोवल यांना सुरक्षा पुरविणार्‍या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तैनातीचीही माहिती मिळविली होती. ही सारी माहिती व व्हिडिओ त्याने सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानातील आपल्या हँडलरला पाठविली. या हँडलरला डॉक्टर असे म्हटले जाते, हे देखील हिदायतुल्लाह याने चौकशीत सांगून टाकले. ही माहिती उघड झाल्यानंतर माध्यमांमध्ये खळबळ माजली आहे. २०१६ साली भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक तसेच २०१९ सालच्या बालाकोट येथील हवाई हल्ल्यातही अजित डोवल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना टपून बसलेल्या असताना देखील भारतात घातपात होऊ न देण्यासाठी अजित डोवल यांनी फार मोठे योगदान दिले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, डोवल यांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचाली या देशाच्या दहशतवादी धोरणात काडीचाही बदल झालेला नसल्याचे दाखवून देत आहेत.

leave a reply