भारतासमोर पाकिस्तानची फौज २४ तासही टिकणार नाही

- पाकिस्तानच्या विरोधी पक्षनेत्यांची कबुली

इस्लामाबाद – भारताच्या आक्रमणासमोर पाकिस्तानची फौज चोविस तास देखील टिकाव धरू शकणार नाही, असे विधान करून पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते मौलाना फझलुर रेहमान यांनी खळबळ माजविली आहे. त्याचवेळी पाकिस्तानच भारताकडे चर्चेसाठी याचना करीत आहे, असे सांगून फझलुर रेहमान यांनी आपल्या देशाचे सरकार व लष्कराची कोंडी करून टाकली आहे. भारतानेच पाकिस्तानला चर्चेचा प्रस्ताव दिल्याचे दावे पाकिस्तानच्या सरकार व माध्यमांकडून केला जातो. त्यामुळे रेहमान यांनी केलेली ही विधाने पाकिस्तानमध्ये अतिशय वादग्रस्त ठरत आहेत.

पाकिस्तानच्या ‘जमात उलेमा इस्लाम-फझल’ या संघटनेचे प्रमुख व विरोधी पक्षांचे मध्यवर्ती संघटन बनलेल्या ‘पकिस्तानी डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’चे सूत्रधार अशी मौलाना फझलुर रेहमान यांची ओळख आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबरच पाकिस्तानी लष्करावर रेहमान यांनी कठोर टीका करण्याचे सत्र सुरू केले आहे. भारताने आक्रमण केले तर पाकिस्तानचे लष्कर त्यासमोर २४ तास देखील टिकाव धरू शकत नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था धुळीला मिळालेली आहे. अशा काळात पाकिस्तानला जबाबदार नेत्याची गरज आहे, असे रेहमान यांनी पत्रकारांसमोर म्हटले होते.

तसेच भारताकडून चर्चेसाठी प्रस्ताव मिळत असल्याचा पाकिस्तानच्या सरकार व माध्यमांचा दावाही रेहमान यांनी खोडून काढला. पाकिस्तानच भारताशी चर्चा करण्यासाठी याचना करीत आहे. पण भारताकडून तसे प्रस्ताव आल्याची दिशाभूल करणारी माहिती पाकिस्तानी जनतेला दिली जात असल्याची टीका रेहमान यांनी केली. त्यांच्या या विधानांचे फार मोठे पडसाद पाकिस्तानात उमटत आहेत. त्यांनी हे दावे करण्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पत्रकारांशी अनौपचारिक पातळीवर चर्चा केली होती. भारत व पाकिस्तानमध्ये सलोखा प्रस्थापित व्हावा आणि व्यापार व्हावा, असे आपले म्हणणे असल्याचे यावेळी जनरल बाजवा यांनी स्पष्ट केले होते.

भारताबरोबरील पाकिस्तानच्या सहकार्याला लष्कराचा विरोध राहिलेला नाही, हा संदेश याद्वारे जनरल बाजवा यांना द्यायचा होता. मात्र त्यांनी अधिकृत पातळीवर हे दावे न करण्याचा सावधपणा दाखविलेला आहे. तो संदर्भ पकडून पाकिस्तानच्या लष्कराची क्षमता व यादेशाची सद्यस्थिती यावर मौलाना फझलुर रेहमान यांनी बोट ठेवले. या स्थितीला इम्रान खान यांच्या सरकारबरोबरच त्यांना सत्तेवर आणणारे पाकिस्तानचे लष्करही जबाबदार असल्याचे खापर रेहमान यांच्याकडून फोडले जात आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी रेहमान यांच्यावर टीकेची झोड उठविली. रेहमान यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर बेजबाबदार विधाने केल्याची टीका माहिती व प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी केली. मात्र त्यांच्या विधानांचे पडसाद पाकिस्तानात उमटत असून सध्या आपला देश अत्यंत बिकट अवस्थेत असल्याचे पाकिस्तानी जनता हताशपणे मान्य करीत आहेत. शिवाय जनतेसमोर सत्य मांडण्याची धमक पाकिस्तानच्या सरकारकडे नाही, ही बाब देखील या देशाचे काही जबाबदार पत्रकार व विश्‍लेषक परखडपणेे सांगत आहेत.

leave a reply