भारताने ‘पीओके’मधील निवडणुकीवर घेतलेल्या आक्षेपावर पाकिस्तानचा थयथयाट

- पीओकेमध्ये ‘आझादी’चे नारे घुमले

नवी दिल्ली/इस्लामाबाद – पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पाकिस्तानच्या सरकारने केलेल्या निवडणुकीवर भारताने आक्षेप नोंदविला होता. हा भूभाग पाकिस्तानने अवैधरित्या ताब्यात घेतलेला असून इथे निवडणुकीचे नाटक घडवून पाकिस्तान आपल्या बेकायदेशीर कब्जावर पांघरूण घालू पाहत आहे, अशी जळजळीत टीका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली होती. त्यावर पाकिस्तानने भारताच्या राजदूतांना समन्स बजावल्याचे वृत्त आहे. मात्र पीओकेमधील ही निवडणूक पाकिस्तानच्या इतर राजकीय पक्षांनाच मान्य नाही. पीओकेमधील जनता देखील ‘आझादी’चे नारे लावून भारताने आम्हाला मुक्त करावे, असे साकडे घालत आहेत. याला पंतप्रधान इम्रान खान जबाबदार असल्याचा ठपका विरोधी पक्षनेत्या मरियम नवाझ यांनी ठेवला आहे.

भारताने ‘पीओके’मधील निवडणुकीवर घेतलेल्या आक्षेपावर पाकिस्तानचा थयथयाट - पीओकेमध्ये ‘आझादी’चे नारे घुमले25 जुलै रोजी पीओकेमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत पंतप्रधान इम्रान खान यांचा ‘तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षाला बहुमत मिळाले. मात्र पाकिस्तानचे सरकार व लष्कराने मिळून निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप सुरू झाला. याआधी पीओकेची सत्ता असलेल्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ’च्या (पीएमएल-एन) नेत्या मरियम नवाझ यांनी हा निकाल मानण्यास नकार दिला. ‘पीएमएल-एन’च्या कार्यकर्त्यांसह पीओकेच्या जनतेही याविरोधात रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला. यामुळे पीओकेमध्ये ‘आझादी’ अर्थात स्वातंत्र्याच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. इतकेच नाही तर ‘कश्मीर बनेगा हिंदुस्तान’च्या घोषणाही निदर्शक देत आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या जवानांसमोर या घोषणा दिल्या जात होत्या, ही सर्वात लक्षणीय बाब ठरते. ‘पीएमएल-एन’च्या एका उमेदवाराने तर आपण भारताकडे न्याय मागू असे जाहीर करून पाकिस्तानात खळबळ माजविली होती.

या पार्श्‍वभूमीवर, गुरुवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘पीओके’मधील निवडणुकीवर जोरदार टीका केली. भारताच्या भूभागात ही तथाकथित निवडणूक घेण्याचा अधिकारच पाकिस्तानला नाही. असे असताना, या भूभागावरचा आपला अवैध ताबा लपविण्यासाठी पाकिस्तानने हा निवडणुकीचा घाट घातला. भारत याचा कडक शब्दात निषेध नोंदवित आहे. पाकिस्तानने भारताच्या या भूभागाचा अवैध ताबा सोडून द्यावा, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले होते. पाकिस्तानातच पीओकेमध्ये झालेल्या निवडणुकीवर जोरदार टीका होत असताना, भारताकडून आलेली ही प्रतिक्रिया पाकिस्तानला चांगलीच झोंबल्याचे दिसते.

शुक्रवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या राजदूतांना समन्स धाडून या प्रकरणी जाब विचारला. भारताने पीओकेबाबत केलेले दावे पाकिस्तान नाकारत असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर प्रमुख विरोधी पक्षनेत्या असलेल्या मरियम नवाझ भारताचीच भाषा बोलून पीओकेमधील निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करीत असल्याचा ठपका, पाकिस्तानच्या सरकारने ठेवला आहे. तसेच बांगलादेशची निर्मिती करणार्‍या शेख मुजिबूर रेहमान यांच्याच वाटेने मरियम नवाझ पुढे चालल्या आहेत, अशी टीका इम्रान?खान यांच्या सरकारचे समर्थक करीत आहेत.

पाकिस्तानने आत्तापर्यंत पीओकेमध्ये घेतलेल्या निवडणुका म्हणजे नाटक होते, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले. पाकिस्तानात सरकार असलेल्या पक्षालाच पीओकेच्या निवडणुकीत बहुमत मिळते, हा योगायोग नाही. तर तसे घडवून आणले जाते. त्यामुळे पीओकेची निवडणूक म्हणजे ड्रामाच ठरतो, अशी कबुली पाकिस्तानी पत्रकारांना नाईलाजाने द्यावी लागत आहे. इतकेच नाही तर पीओकेमध्ये निवडणुकीचे आयोजन केल्याबद्दल काहीजणांनी पाकिस्तानच्या लष्कराचे आभार मानले, यावर बोट ठेवून निवडणुकीचे आयोजन हे लष्कराचे काम आहे का? असा प्रश्‍न तटस्थ पत्रकार विचारात आहेत. पीओकेच नाही, तर गेल्या 70 वर्षात पाकिस्तानात झालेल्या निवडणुका निष्पक्ष नव्हत्या, प्रत्येक निवडणुकीत गैरव्यवहार झालेले आहेतच, अशी टीका या निमित्ताने होत आहे.

यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. पीओकेमध्ये आझादी अर्थात स्वातंत्र्याच्या घोषणा घुमू लागल्याने पाकिस्तानच्या लष्कराचेही डोळे पांढरे झाले आहेत. पीओकेमधील या असंतोषाचा भारत लाभ घेईल आणि लवकरच भारत पीओके ताब्यात घेण्यासाठी हल्ला चढविल, अशी भीती पाकिस्तानातील भारतद्वेष्ट्या कट्टरपंथिय विश्‍लेषकाने व्यक्त केली आहे. तसे होण्याआधी पाकिस्तानी लष्करानेच भारतावर हल्ला चढवावा, अशी मागणी या विश्‍लेषकाने केली आहे.

leave a reply