पंजशीर तालिबानच्या ताब्यात नाही

- फ्रान्सच्या प्रख्यात विश्‍लेषकाचा दावा

पॅरिस/बझराक – पंजशीरच्या खोर्‍यावर तालिबानने नियंत्रण मिळविले आहे. पण पंजशीरच्या टेकड्या अजूनही नॉर्दन अलायन्सच्या ताब्यात आहेत. ही तालिबानविरोधी आघाडी अधिकाधिक मजबूत होत असून त्यांचे मनोबल उच्च कोटीचे आहे. अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद पंजशीरच्या कुठल्या तरी भागात स्वतंत्र अफगाणिस्तानची मशाल हातात घेऊन उभा आहे. मी स्वत: अहमद मसूद यांच्याशी बोललो आहे’, असा दावा फ्रान्सचे बुद्धिमंत ‘बर्नार्ड-हेन्री लेव्ही’ यांनी केला. नॉर्दन अलायन्सने देखील ६० टक्के पंजशीर आपल्या ताब्यात असल्याचे सांगून तालिबानला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

पंजशीर ताब्यात घेऊन अफगाणिस्तान स्वतंत्र केल्याचा दावा तालिबानने सोमवारी केला होता. तालिबानच्या हल्ल्यानंतर पंजशीरचा नेता अहमद मसूद आणि माजी राष्ट्राध्यक्ष अमरूल्ला सालेह यांनी ताजिकिस्तानला पलायन केल्याचे तालिबानने जाहीर केले होते. पण मसूद व सालेह हे दोघेही अजूनही पंजशीरमध्येच असल्याचे नॉर्दन अलायन्सने प्रसिद्ध केले होते. वर्षभरापूर्वी मसूद यांची भेट घेणार्‍या फ्रेंच विश्‍लेषक लेव्ही यांनी याबाबतची माहिती प्रसिद्ध करून तालिबानचा दावा निकालात काढला.

दरम्यान, २० वर्षांपूर्वी तालिबानच्या राजवटीला आव्हान देणार्‍या अहमद शाह मसूद यांच्या थडग्याची तालिबानने नासधूस केल्याची माहिती समोर येत आहे. दोन दशकांपूर्वी तालिबानने मसूद यांची हत्या घडविली होती. त्यांच्या थडग्याची अवहेलना करुन तालिबानने नॉर्दन अलायन्सला चिथावणी दिल्याचा दावा केला जातो.

leave a reply