पाकिस्तानात समांतर सरकार राज्य करीत आहेत

- नवाझ शरीफ यांचा घणाघात

लंडन/कराची – पाकिस्तान खूपच अस्थिर बनले असून या देशात एकाचवेळी दोन समांतर सरकार राज्य करीत आहेत. हे राज्यकर्ते देशहितापेक्षाही स्वहिताला महत्त्व देत असून यामुळे देशात गोंधळ माजल्याचा घणाघाती प्रहार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला. गेल्या दोन दिवसांपासून सिंध प्रांतात सुरू असलेल्या घडामोडींवर बोलताना शरीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली. सिंधची राजधानी कराचीमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली असून पाकिस्तानी लष्कर आणि सिंध पोलिसांमध्ये संघर्ष भडकल्याचा दावा केला जातो. पण पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेली पाकिस्तानी माध्यमे यासंबंधी बातम्या प्रसिद्ध करीत नसल्याच्या आरोपही होत आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई कॅप्टन सफदार अवान यांच्यावरील कारवाई आणि त्यासाठी सिंध प्रांताच्या पोलीस प्रमुखांचे झालेले अपहरण यामुळे पाकिस्तान ढवळून निघाला आहे. सिंध प्रांतात काही ठिकाणी पाकिस्तानी लष्कर आणि पोलीस यांच्यात संघर्ष घडल्याचा दावा केला जातो. या संघर्षात पाकिस्तानी लष्कराचे जवान मारले गेले असून येथील लष्करी कमांडने मार्शल लॉ लागू करण्याची तयारी केल्याचा आरोपही होऊ लागला आहे. पाकिस्तानातील या परिस्थितीवर माजी पंतप्रधान शरीफ यांनी पाकिस्तानातील इम्रान सरकार आणि लष्कर यांच्यावर हल्ले चढविले.

पाकिस्तानात समांतर सरकार राज्य करीत आहेत - नवाझ शरीफ यांचा घणाघात‘पाकिस्तानात अराजकता माजली आहे, हे पटवून देण्यासाठी यापुढे अतिरिक्त पुराव्यांची आवश्यकता नाही. सफदारबरोबर जे काही घडले त्यामुळे सुसंस्कृत समाज आणि समाजव्यवस्थेचे सारे नियम पायदळी दुडविले गेले आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने देशाची लोकशाही आणि लोकशाही संस्था पूर्णपणे उद्‍ध्वस्त केल्या आहेत. यापुढे पाकिस्तानचे भविष्य काय असेल, याची कोणालाच शाश्वती देता येत नाही’, अशी हताश प्रतिक्रिया नवाझ शरीफ यांनी दिली. त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराच्या या दांडगाईच्या विरोधात सिंध पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे शरीफ यांनी समर्थन केले. तसेच सिंध पोलिसांनी लष्कराच्या कारवाईला केलेला विरोध हा इतर संस्थांसाठी एक आदर्श असून त्यांनीही या कृत्याचे पालन करावे, असे शरीफ यांनी सुचविले.

सिंध पोलीस दलातील वरिष्ठांपासून ते खालच्या हुद्द्यावरील जवानापर्यंत बहुतांशांनी राजीनाम्याची तयारी केल्याचे दावे केले जात आहेत. फक्त राजीनामाच नाही तर सिंध पोलिसांनी लष्कराविरोधात आघाडी उघडण्याची तयारी केल्याचे इशारेही दिले जात आहेत. पण पाकिस्तानच्या सरकार व लष्कराने माध्यमांवर बंदी टाकल्यामुळे शरीफ यांचे भाषण पाकिस्तानात प्रसारित झाले नसून सिंधमधील सत्य जगासमोर येत नसल्याचा आरोप होत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचे लष्कर जनतेतील रोष दडपण्याचा जितका प्रयत्‍न करील, तितका तो अधिक उफाळून बाहेर येईल, असे इशारे पाकिस्तानातील विरोधी पक्षनेते देऊ लागले आहेत.

दरम्यान, सिंध प्रांतातील या कारवाईचे पडसाद पाकिस्तानच्या लष्करावर देखील उमटत असल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानच्या लष्करातील सिंध रेजिमेंटमध्ये नाराजी पसरली असून काही जवानांनी सीमेवरील आपली जबाबदारी सोडून माघार घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते. पाकिस्तान सरकार व लष्कराने हे दावे फेटाळून लावले असून भारतीय माध्यमे खोट्या बातम्या पसरवित असल्याचा आरोप केला आहे. पण सिंध प्रांतात एवढे अस्थैर्य निर्माण झालेले असताना, लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा तातडीने सीमेसाठी का रवाना झाले, याचे समाधानकारक उत्तर पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून मिळू शकलेले नाही. तर पाकिस्तानच्या लष्कराची कमांड फोर्स उभारण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या निवृत्त जनरल गुलाम मुश्तफा यांनी देखील देशातील सध्याच्या स्थितीचे परिणाम लष्कर तसेच पोलीस दलातील अधिकारी, जवानांच्या मनोधैर्यावर होईल, असा इशारा एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे.

leave a reply