दक्षिण आफ्रिकेतील दंगली पूर्वनियोजित कटाचा भाग

- राष्ट्राध्यक्ष सिरील राम्फोसा यांचा आरोप

केपटाऊन – दक्षिण आफ्रिकेत भडकलेला भीषण हिंसाचार हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून यामागे देशातील लोकशाहीच्या शत्रूंचा हात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्राध्यक्ष सिरील राम्फोसा यांनी केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील सत्ताधारी राजवट उलथण्यासाठी उठाव करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना झालेल्या तुरुंगवासाच्या मुद्यावरून देशात भीषण दंगली भडकल्या आहेत. या दंगलींमध्ये आतापर्यंत 212 हून अधिक जणांचे बळी गेले असून मालमत्तेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या एक आठवड्याहून अधिक काळ दक्षिण आफ्रिकेच्या विविध भागात भीषण दंगली भडकल्या आहेत. देशाच्या अनेक भागांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले असून परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष राम्फोसा यांनी शुक्रवारी रात्री देशाला संबोधित करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अचानक मोठ्या प्रमाणावर भडकलेल्या हिंसक परिस्थितीचा सामना करण्यास यंत्रणा पूर्ण तयार नव्हत्या याची कबुलीही दिली.

‘गेल्या आठवड्याभरात देशात भडकलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. देशातील लोकशाहीवर जाणुनबुजून हल्ला करण्यात आला. हिंसाचारासाठी भडकविणार्‍या सूत्रधारांना देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करायची होती. एका लोकशाहीवादी देशाला कमकुवत किंवा सरळ उद्ध्वस्त करण्याचा डाव आखण्यात आला होता. सत्ताधारी राजवट उलथण्यासाठी उठाव घडविण्याचा हेतू होता. गरीबी व बेरोजगारीच्या मुद्यांचा गैरवापर केला गेला आणि निष्पाप जनतेच्या जीवाशी खेळ करण्यात आला’, असा घणाघाती आरोप राष्ट्राध्यक्ष सिरील राम्फोसा यांनी केला.

पूर्वनियोजित कटाचा भागयावेळी राष्ट्राध्यक्ष राम्फोसा यांनी दंगलीत बळी पडलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांचाही विशेष उल्लेख केला. आठवडाभर सुरू असलेल्या दंगलींमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याची व हे हल्ले नियोजित होते, असा दावा दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. ‘भारतीय वंशाचे नागरिक दक्षिण आफ्रिकेसाठी, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी व समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल, त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही’, अशी ग्वाहीदेखील राम्फोसा यांनी दिली. दक्षिण आफ्रिकेय झालेल्या दंगलीत बळी गेलेल्यांपैकी सुमारे 100 नागरिक भारतीय वंशाचे असल्याचे सांगण्यात येते.

दक्षिण आफ्रिका सरकारविरोधात बंड घडविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला असून, जनतेने त्याला साथ दिलेली नाही, असा दावाही राष्ट्राध्यक्ष राम्फोसा यांनी यावेळी केला. देशातील हिंसाचारासाठी जबाबदार असणार्‍यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत धोका कायम असल्याचेही दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले. यावेळी हिंसाचारामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी काही प्रमाणात अर्थसहाय्य पुरविण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. गेल्या आठवड्याभरातील हिंसाचारात आठ कारखान्यांसह 160हून अधिक शॉपिंग मॉल्स, दुकाने व गोदामे लुटण्यात आली असून अनेकांना आगीही लावण्यात आल्या आहेत.

दक्षिण आफ्रिक्रेत 1994 साली झालेल्या सत्तापालटानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात असंतोष व हिंसाचार पहायला मिळत असल्याचा दावा प्रसारमाध्यमे व विश्‍लेषकांनी केला होता. 2009 ते 2018 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष असणार्‍या जेकब झुमा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात तपासात सहकार्य न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

एखादा माजी राष्ट्राध्यक्षांना तुरुंगात जावे लागण्याची दक्षिण आफ्रिकेतील ही पहिलीच घटना ठरली आहे. मात्र झुमा यांच्यावरील कारवाई त्यांच्या समर्थकांना पटली नसून त्यांनी हा हिंसाचार घडविल्याचे मानले जाते. काही माध्यमांनी झुमा यांच्या मुलींनी हिंसाचाराला फूस दिल्याचाही दावा केला आहे.

leave a reply