अफगाणिस्तानचा भूतकाळ हे या देशाचे भवितव्य असू शकत नाही

- भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

दुशांबे – ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’च्या बैठकीत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादविरोधी लढ्यात या संघटनेने महत्त्वाची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. अफगाणिस्तानातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, ताजिकिस्तानच्या दुशांबे येथे पार पडत असलेली ‘एससीओ’ची ही बैठक लक्षवेधी ठरते. या बैठकीत भारताने पुन्हा एकदा दहशतवादापासून सुरक्षेला संभवणार्‍या धोक्याचा मुद्दा अधोरेखित केला. अफगाणिस्तानचा भूतकाळ हेच या देशाचे भवितव्य असू शकत नाही, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पुन्हा या देशाला दहशतवादाच्या गर्तेत ढकलता येणार नाही, असे यावेळी बजावले. या बैठकीदरम्यान भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली.

अफगाणिस्तानचा भूतकाळ हे या देशाचे भवितव्य असू शकत नाही- भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर‘एससीओ’च्या सदर बैठकीत इतर विषयांपेक्षाही अफगाणिस्तानातील घडामोडींचा मुद्दा ऐरणीवर होता. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफणिस्तानचा भूतकाळ हेच या देशाचे भवितव्य असू शकत नाही, असे सांगून तालिबानसारख्या दहशतवादी संघटनेच्या हाती अफगाणिस्तानला सोपविता येणार नाही, याची जाणीव करून दिली. सारे जग बळाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्याच्या विरोधात आहे, असे सांगून जयशंकर यांनी तालिबानच्या हिंसाचाराला विरोध केला. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या शेजारी देशांना दहशतवाद, फुटीरतावाद आणि कट्टरवादाची झळ बसणार नाही, याची दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दहशतवाद व कट्टरवाद यांना विरोध करणे हे ‘एससीओ’चे प्रमुख ध्येय असल्याची आठवण भारतच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या बैठकीत करून दिली. यासाठी दहशतवाद्यांना पुरविला जाणारा निधी रोखण्याची आवश्यकता आहे, असे जयशंकर पुढे म्हणाले. थेट उल्लेख न करता जयशंकर यांनी याद्वारे पाकिस्तानला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. हिंसाचाराने प्रश्‍न सुटू शकत नाी, शांतता व वाटाघाटीने अफगाणिस्तानची समस्या सुटेल. दोहा येथे अमेरिका व तालिबानमध्ये झालेला करार किंवा रशियाच्या मॉस्कोमध्ये झालेल्या शांतीचर्चेच्या चौकटीत अफगाणिस्तानचा प्रश्‍न सोडविता येईल, असे जयशंकर यांनी सुचविले आहे.

नव्या पिढीला आपल्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यांचा अपेक्षाभंंग करता येणार नाही, असे आवाहन करून जयशंकर यांनी एससीओच्या सदर बैठकीत अफगाणिस्तानबाबत सक्रीय भूमिका पार पाडण्याचे आवाहन केले. दरम्यान, एससीओच्या या बैठकीत भारताने अफगाणिस्तानबाबत ठाम भूमिका स्वीकारली असून पुढच्या काळात देखील भारत अफगाणिस्तानबाबत अधिक सक्रीय भूमिका पार पाडण्याची तयारी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, अफगाणिस्तानात रक्तपात सुरू असतानाच, अफगाणी सरकार तालिबानबरोबर कतारमध्ये नव्याने वाटाघाटी सुरू करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. या वाटाघाटी फसल्यानंतर, अफगाणिस्तानाला भारताच्या लष्करी सहाय्याची आवश्यकता भासेल, असे या देशाच्या भारतातील राजदूतांनी म्हटले आहे. तालिबानबरोबरील युद्धात अफगाणी लष्कराला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा तसेच आर्थिक सहाय्याची आवश्यकता भासणार आहे. यासाठी भारत सहाय्य करील, अशी अपेक्षा याआधीही अफगाणी सरकारने व्यक्त केली होती.

अफगाणिस्तानातील परिस्थिती भयंकर बनलेली असताना, भारताने तालिबानला अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होण्याची सूचना द्यावी, अशी मागणी अफगाणिस्तानच्या भारतातील राजदूतांनी केली. यासाठी तालिबानने या क्षेत्रातील दहशतवाद्यांबरोबर संबंध तोडून टाकण्याची आवश्यकता असल्याचे अफगाणी राजदूतांनी म्हटले आहे.

leave a reply