पाकिस्तानच्या कारस्थानामुळे हवालदिल झालेल्या ‘पीओके’च्या जनतेचे भारताला साकडे

मुझफ्फराबाद – कोरोनाव्हायरसची साथ येण्यापूर्वीच पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (पीओके) गव्हाच्या पिठाचे दर साधारण ३५ रुपयांवर होते. मात्र ही साथ आल्यानंतर आता हे दर दुपटीने वाढले आहेत. केवळ दरवाढ नाही तर अन्न टंचाईचा सामना ‘पीओके’मधील जनता करीत असून अधिक पैसे मोजूनही अन्नधान्य तसेच औषधे मिळत नसल्याची तक्रार येथील जनता करीत आहे. त्यातच पाकिस्तानचे सरकार पीओकेमध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेल्यांना मोठ्या प्रमाणात धाडत असून इथल्या स्थानिकांना अल्पसंख्यांक बनविण्याचा भयंकर कट यामागे आहे. यामुळे पीओके जनता हवालदिल झाली आहे व भारताकडे सहाय्याची याचना करू लागली आहे.

पाकिस्तानचे सर्व प्रांत कोरोनाव्हायरस साथीचा सामना करण्यासाठी आपल्याकडे पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याची तक्रार करत आहेत. इतकेच नाहीतर लोक अशा काळात गोरगरिबांच्‍यापर्यंत पोहोचवण्यासाठी अन्नधान्य व औषधे आवश्यक प्रमाणात उपलब्ध नसल्याचा ओरडा पाकिस्तानचे सर्वच प्रांत करीत आहेत. अशा परिस्थितीत पीओकेमधील जनतेची अवस्था सर्वात बिकट बनली आहे. आधीपासूनच या प्रांताकडे पाकिस्तानचे दुर्लक्ष झाले होते व ही साथ आल्यानंतर पाकिस्तानचे सरकार इथल्या जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे.

पीओकेमधील बहुसंख्य असलेल्या स्थानिकांना अल्पसंख्यांक बनवून पाकिस्तानच्या इतर प्रांतातील नागरिकांना याठिकाणी बसविण्याचे कटकारस्थान पाकिस्तानने या आधी आखले होते. कोरोनाव्हायरसची साथ आल्यानंतर पाकिस्तानचे सरकार व लष्कर “पीओके’ मध्ये कोरोनाव्हायरस रुग्ण धाडत असल्याची तक्रार स्थानिक जनतेकडून केली जाते. इतकेच नाही, तर तिथे अन्नधान्याचा पुरवठ्याला ही अजिबात महत्त्व दिले जात नसून त्याच्या टंचाईमुळे पीओकेची जनता हवालदिल बनली आहे म्हणूनच काही दिवसांपूर्वी पस्तीस रुपये किलो इतक्या दराने मिळणारे गव्हाचे पीठ दुपटीने महाग झाले आहे.

तसेच कोरोनाव्हायरसची साथ थैमान घालत असताना ‘पीओके’ मधील जनतेला औषधांचा पुरवठा करण्याकडे ही पाकिस्तानने लक्ष दिले नाही. पाकिस्तानचे सरकार व लष्कराकडून केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामागे फार मोठा कट आहे. सध्या ‘पीओके’मध्ये नामधारी राष्ट्रपती व पंतप्रधान असून इथल्या सरकारची व्यवस्था स्वतंत्र असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातो. म्हणूनच त्या प्रांताला पाकिस्तानकडून आझाद काश्मीर असे म्हटले जाते. आताही ‘पीओके’ ची उरलीसुरली आझादी देखील पाकिस्तान काढून घेण्याच्या तयारीत आहे त्यासाठी कोरोनाव्हायरसचा वापर करण्याचा डाव पाकिस्तानच्या लष्कराने आखला आहे.

पाकिस्तानच्या कचाट्यातून पीओके व गिलगिट बाल्टिस्तानला सोडविण्यासाठी पाकिस्तानच्या बाहेर राहून लढा देणाऱ्या काही कार्यकर्त्यांमुळे ही बाब उघड झाली होती. आता पीओके मधील स्थानिक देखील पाकिस्तानच्या या कारस्थानाचा विरोधात खडे ठाकले असून या विरोधात त्यांनी निदर्शनेही केल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत राजौरी व जम्मू या पीओकेच्या जवळ असलेल्या भागातून भारताने आम्हाला औषधे व अन्नधान्याचा पुरवठा करावा अशी मागणी पीओकेची जनता करीत आहे. अत्यंत खडतर काळात पीओकेच्या जनतेने भारतावर दाखविलेला हा विश्वास व पाकिस्तानवरील पीओकेच्या जनतेचा अविश्वास फार मोठ्या बदलाचे संकेत देत आहे.

leave a reply