‘साऊथ चायना सी’तील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईचा फिलिपाईन्सला अधिकार

- फिलिपाईन्सच्या लष्करप्रमुखांचा इशारा

मनिला – फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात तळ ठोकलेल्या चीनच्या मिलिशिया जहाजांजवळ आता बेकायदा बांधकामे उभी राहू लागली आहेत. ही बांधकामे आपल्या सागरी सुरक्षा आणि शांततेसाठी धोकादायक ठरत असल्याची टीका फिलिपाईन्स करीत आहे. तसेच या बेकायदेशीर बांधकामांविरोधात आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार आपल्या देशाला असल्याचा इशारा फिलिपाईन्सच्या लष्करप्रमुखांनी दिला. दोन दिवसांपूर्वीच फिलिपाईन्सने चीनला मिलिशिया जहाजे त्वरीत माघारी घेण्याचे आवाहन केले होते.

‘साऊथ चायना सी’तील स्प्रार्टले द्विपसमुहांच्या ‘युनियन बँक’ बेटांच्या हद्दीत मोठमोठी बेकायदेशीर बांधकामे उभी राहत आहेत. ही बांधकामे हवाई गस्त घालणार्‍या फिलिपाईन्सच्या विमानांनी हेरलेली आहेत, अशी माहिती लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल सिरिलिटो सोबेयाना यांनी दिली. फिलिपाईन्सच्या लष्करप्रमुखांनी या बांधकामांसाठी चीनवर थेट आरोप करण्याचे टाळले. पण सदर बांधकाम चीनच्या घुसखोर मिलिशिया जहाजांजवळ उभारल्याची माहिती फिलिपाईन्सच्या लष्कराने दिली.

याशिवाय फिलिपाईन्सच्या लष्करप्रमुखांनी ‘साऊथ चायना’च्या क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे उभारणार्‍या आणि सुरक्षेसाठी आव्हान ठरणार्‍यांवर कारवाईचा इशारा दिला. ‘सदर बेकायदेशीर बांधकामे आणि कारवाया सागरी क्षेत्रातील शांतता, स्थैर्य व सुरक्षेसाठी घातक ठरत आहेत. या सागरी क्षेत्रावर आपल्या देशाचे निर्विवाद आणि विशेष अधिकार आहेत व आंतरराष्ट्रीय सागरी नियम देखील फिलिपाईन्सला हे अधिकार देतात. तेव्हा या क्षेत्रातील राष्ट्रीय हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी फिलिपाईन्सचे प्रयत्न अखंडपणे सुरू राहतील’, असा इशारा लेफ्टनंट जनरल सोबेयाना यांनी दिला.

फिलिपाईन्सच्या लष्करप्रमुखांनी थेटपणे उल्लेख टाळला असला तरी त्यांचा हा इशारा चीनसाठी असल्याचे समोर येत आहे. गेल्या महिन्यात चीनच्या २२० मिलिशिया जहाजांनी फिलिपाईन्सच्या ‘जुलियन फिलिप’ या द्विपाच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. या जहाजांचे नेतृत्व लष्करी प्रशिक्षण घेतलेले मिलिशिया अर्थात सशस्त्र दल असल्याचा आरोप फिलिपाईन्सने केला आहे. या घुसखोर जहाजांची संख्या अडीचशेच्या जवळ असल्याची नवी माहितीही समोर येत आहे.

मिलिशिया जहाजे रवाना करून या सागरी क्षेत्राचे लष्करीकरण करणार्‍या चीनने सदर जहाजे माघारी घ्यावी, असे आवाहन फिलिपाईन्सने केले होते. तर फिलिपाईन्सने चीनच्या जहाजांच्या विरोधात हवाई तसेच सागरी गस्त सुरू केली होती. दोन दिवसांपूर्वी देखील फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाने चीनला त्वरीत जहाजे माघारी घ्यावी, असे नव्याने आवाहन केले. पण या घटनेला महिना लोटल्यानंतरही चीनची जहाजे मोठ्या संख्येने या क्षेत्रात तैनात आहेत.

अशा परिस्थितीत, चीनच्या घुसखोर जहाजांजवळच्या क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप फिलिपाईन्स करीत आहे. त्याचबरोबर या बांधकामावर कारवाई करण्याचा इशाराही फिलिपाईन्स देत आहे. या इशार्‍याच्या आधी फिलिपाईन्स व अमेरिकेमध्ये चर्चा पार पडली होती.

leave a reply