केरळात भूस्खलन आणि विमान अपघातात ३४ जणांचा बळी

नवी दिल्ली – शुक्रवारी केरळात नैसर्गिक आणि मानवी अशा दोन आपत्तींमध्ये ३४ जणांचा बळी गेला आहे. केरळात सकाळी इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू झाला, तर सायंकाळी कोझिकोड येथील विमानतळावर एअर इंडियाचे विमानाचा अपघात होऊन १६ जण ठार झाले. दोन्ही घटनांमध्ये जखमींची संख्या मोठी आहे. इडुक्कीमधील मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी ५० जण गाडलेले असल्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे  मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Keralaकेरळाच्या अतिवृष्टीमुळे इडुक्की आणि मुन्नारमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे.  या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. मुन्नारमधील एका घटनेत ३ जणांचा बळी गेला आहे. तसेच इडुक्की जिल्ह्यातील भूस्खलनाच्या घटनेत येथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांच्या घरांवर मातीचा ढिगारा कोसळला. यामध्ये सुमारे ५० जण गाडले गेले असून आतापर्यंत १५ जणांचे मृतदेह सापडले आहेत. 

तर रात्री कोझिकोड येथील विमानतळावर दुबईवरून केरळला आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. हे विमान धावपट्टीवर  उतरत असताना दोन तुकडे झाले. या विमानात १८४ प्रवासी, दोन वैमानिक आणि ६ विमान कर्मचारी होते. सुमारे १२३ जण या अपघातात जखमी झाले आहेत. तर आतापर्यंत १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये विमान वैमानिकांचाही समावेश आहे. 

leave a reply