पंतप्रधानांची नव्या वाहन स्क्रॅपेज धोरणाची घोषणा

नवी दिल्ली – पंधरा आणि वीस वर्ष जुनी वाहने भंगारात काढण्याचे नवे व्हेईकल स्क्रॅपेज धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जाहीर केले. या धोरणामुळे भारतीय वाहन क्षेत्रात अनेक बदल होतील. तसेच अपघात, आणि प्रदूषण कमी करण्यासही हे नवे धोरण महत्त्वाचे ठरेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जुनी वाहने भंगारात काढण्याचे धोरण आणण्यात येईल, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.

पंतप्रधानांची नव्या वाहन स्क्रॅपेज धोरणाची घोषणाशुक्रवारी गुजरातमध्ये पार पडलेल्या व्हर्च्युअल गुंतवणूक परिषदेमध्ये व्हर्च्युअल संबोधन करतात पंतप्रधान मोदी यांनी हे धोरण जाहीर केले. या धोरणाचा लाभ सर्वांनाच होईल. 15 वर्ष जुनी व्यावसायिक वाहने आणि 20 वर्ष जुनी खाजगी वाहने फिटनेस टेस्टमध्ये पास झाली नाहीत, तर ती भंगारात काढण्यात येणार आहेत. वाहन भंगारात काढल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र मालकांना दिले जाईल. हे प्रमाणपत्र दाखविल्यास नव्या वाहनांच्या खरेदीवर नोंंदणी शुल्क लागणार नाही. तसेच रस्ते करामध्येही सवलत मिळणार आहे. याशिवाय आणखी महत्त्वाचे लाभ होतील. यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वाहन चालकांच्या जीवाचा धोका कमी होणार आहे. जुन्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे बरेच अपघात टळतील, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

याशिवाय जुन्या वाहनांवर जास्त देखभाल खर्च येतो. इंधनही वाहने अधिक खातात हा खर्च कमी होणार आहे. तसेच या धोरणामुळे प्रदूषणही कमी करण्यास मदत मिळेल. याशिवाय अर्थव्यवस्थेसाठीही अगणित फायदे या धोरणामुळे होतील. भंगारातील गेलेल्या वाहनांच्या पोलादाने भारत पोलाद क्षेत्रात स्वावलंबी बनू शकेल. वाहन उत्पादन क्षेत्रात मूल्यवर्धीत साखळी तयार करणे आणि आयातीवरील अवलंबित्त्च कमी करणे हा या धोरणाचा उद्देश आहे. तसेच यामुळे 10 हजार कोटीहून अधिक गुंतवणूक देशात येईल व हजारो नवे रोजगार उपलब्ध होतील, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

क्षमता संपलेली वाहने वैज्ञानिकदृष्ट्या रस्त्यावरून काढणे आणि देशातील वाहनांच्या आधुनिकीकरणात हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावेल. नवे धोरण भंगार संबंधीत क्षेत्रालाही नवी ऊर्जा देईल, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या धोरणाअंतर्गत वाहने केवळ त्यांच्या वयोमानाच्या आधारावर रद्द केली जाणार नाहीत. तर त्यांची तपासणी करून फेटनेस टेस्टमध्ये नापास झालेली वाहनेच भंगारात काढण्यात येणार आहेत. यासाठी ऑटोमेटेड फिटनेस सेंटर चालविली जाणार आहेत. ठरावीक काळानंतर या ऑटोमेटेड फिटनेस सेंटरमध्ये येऊन वाहनांची तपासणी करावी लागेल.

leave a reply