कोरोनाच्या लसीबाबत पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा

नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी लस आल्यानंतर ती कशाप्रकारे नागरिकांना देण्यात येईल याबाबतच्या योजनेबद्दलही यावेळी माहिती दिली. मात्र लस कधी येईल हे संशोधकांच्या हातात असून राज्यांनी सध्या या साथीचा फैलाव रोखण्यावर भर द्यावा, असेही या बैठकीत स्पष्ट केले.

पंतप्रधान

गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा आलेख 50 हजारांच्या खाली गेला आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यानंतर तातडीने काही उपाययोजना राबवाव्या लागल्या होत्या. काही शहरांमध्ये कर्फ्यूही लावावा लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुखमंत्र्यांबरोबर व्हर्च्युअल बैठक घेतली. यावेळी त्यांनी लस नागरिकांना अशाप्रकारे देण्यात येईल, त्याचे वितरण कसे होईल याबद्दलच्या योजनाबाबतही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले.

भारतात बनत असलेल्या दोन लसी स्पर्धेत आहेत. तसेच जगात ज्या लसी विकसित होत आहेत, त्या कंपन्याही मोठ्या प्रमाणावर लस निर्मितीसाठी भारतीय कंपन्यांशी चर्चा करीत आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्राथमिकेतच्या आधारावर लस दिली जाईल. हा कार्यक्रम टप्प्याटप्प्यात पार पडेल. एखाद्या मोहिमेप्रमाणे हा लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

यासाठी कोल्ड स्टोरेजची संख्या राज्यांना वाढवावी लागेल. यामुळे राज्यांनी यावर काम सुरू करावे. तसेच राज्यांनी लसींच्या वितरणाकरिता विभाग पातळीवर टीम तयार करावी, अशी सूचनाही पंतप्रधानांनी दिली. लवकरच राज्यांना लस वितरणाच्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा दिली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.

leave a reply