पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चा

वॉशिंग्टन – सार्‍या जगाचे डोळे खिळलेली पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली. या शतकाच्या तिसर्‍या दशकाच्या सुरूवातीला होत असलेल्या या चर्चेचे महत्त्व पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. ‘तुमचे नेतृत्त्व नक्कीच या दशकाचा आकार निश्‍चित करणारे ठरेल’, असे पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना म्हणाले. या चर्चेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारत व अमेरिकेच्या द्विपक्षीय संबंधांबाबतची आपली दृष्टी मांडली, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. तर भारत व अमेरिका हे सर्वात मोठ्या लोकशाहीवादी देशांमधील सहकार्य अनिवार्य असल्याचे सांगून पुढच्या काळात हे सहकार्य दोन्ही देशांना अधिक जवळ आणणारे भक्कम, घनिष्ठ असेल, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चापंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील द्विपक्षीय चर्चेचे सारे तपशील समोर आलेले नाहीत. पण या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी या चर्चेबाबत माहिती दिली. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या शिकवणीची आठवण यावेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी करून दिली. आजच्या काळात गांधीजींची ही शिकवण अमलात कशी आणता येईल, यावर विचार करायला हवा, असे बायडेन म्हणाले. तर आपण या वसुंधरेचे विश्‍वस्त आहोत, ही गांधीजींनी मांडलेली संकल्पना येणार्‍या काळासाठी सर्वात महत्त्वाची ठरेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

या दशकात भारत व अमेरिकेमधील व्यापार तसेच तंत्रज्ञानविषयक सहकार्य मोलाचे ठरेल. तंत्रज्ञान जगाला पुढे नेणारी शक्ती ठरत आहे. या क्षेत्रातील आपली गुणवत्ता जगाच्या हितासाठी वापरणे अत्यावश्यक ठरते, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी या आघाडीवर भारत व अमेरिकेचे सहकार्य हा यातील महत्त्वपूर्ण घटक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेत सुमारे ४० लाख भारतीय कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे अमेरिका दरदिवशी अधिकाधिक बलशाली बनत आहे, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.

भारत-अमेरिका मिळून आपल्यासमोरील कित्येक आव्हानांवर मात करू शकतील, असा विश्‍वास राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्यक्त केला. कोरोनाची साथ, हवामान बदल, व्यापार व इंडो-पॅसिफिक हे पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेतील प्रमुख मुद्दे होते, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन पुढे म्हणाले. कोरोनाची साथ व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य यावर पंतप्रधान मोदी यांच्याशी आपण पुढेही चर्चा करीत राहू, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील द्विपक्षीय चर्चा सुमारे ९० मिनिटे चालली. यानंतर दोन्ही नेते क्वाडच्या बैठकीत पुन्हा चर्चा करणार आहेत.

leave a reply