पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर

नवी दिल्ली – आपला हा दौरा भारत व अमेरिकेतील धोरणात्मक सहकार्य दृढ करणारा ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. अमेरिकेच्या दौर्‍यावर जाण्याच्या आधी पंतप्रधानांनी हा विश्‍वास व्यक्त केला. या दौर्‍यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला संबोधित करण्याबरोबच पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन तसेच जपान व ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांबरोबर चर्चा संपन्न होणार आहे. अफगाणिस्तानातील घडामोडी व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागल्याचे दावे काही विश्‍लेषकांनी केले आहेत.

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावरपंतप्रधान मोदी बुधवारी अमेरिकेसाठी रवाना झाले. कोरोनाची साथ, दहशतवादविरोधी कारवाई, हवामानबदलाचे आव्हान तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर आपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमभेला संबोधित करणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. तसेच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेत भारत व अमेरिकेच्या भागीदारीवर तसेच क्षेत्रिय व आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांवर चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तसेच जपानचे पंतप्रधान सुगा व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांच्याबरोबरील चर्चा भारत व जपान तसेच ऑस्ट्रेलियाबरोबरील सहकार्य व्यापक करणारी ठरेल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

आत्ताच्या संवेदनशील काळात पंतप्रधान मोदी यांची ही अमेरिका भेट दोन्ही देशांच्या संबंधांसाठी अतिशय महत्त्वाची ठरते, असे अमेरिकन कॉंग्रेसचे सदस्य रो खन्ना यांनी म्हटले आहे. तर अमेरिकन कॉंग्रेसचे आणखी एक सदस्य राजा कृष्णमुर्ती यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची चर्चा दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक व कोरोनाप्रतिबंधक लसीची निर्मिती आणि वितरण यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. ‘इंडियन डायस्पोरा’चे एम. आर. रंगास्वामी यांनी भारतीय अर्थव्यवस्था उभारी घेत असताना पंतप्रधान मोदी अत्यंत भक्कम स्थितीत अमेरिकेचा दौरा करीत असल्याचे म्हटले आहे. आत्ताच्या भारतात उद्योजकांसाठी अतिशय पोषक वातावरण असल्याचा दावा रंगास्वामी यांनी केला.

कोरोनाच्या साथीमुळे पंतप्रधान मोदी यावेळी भारतीयांना मोठ्या कार्यक्रमाद्वारे संबोधित करू शकणार नाहीत. पण ते अमेरिकेतील उद्योजकांना स्वतंत्र भेटीत नक्कीच संबोधित करतील, असे सांगितले जाते. दरम्यान, पंतप्रधानांच्या या अमेरिका दौर्‍याकडे पाकिस्तान व चीन अतिशय संशयाने पाहत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेबरोबर अधिक उत्तम संबंध प्रस्थापित करून भारताचे पंतप्रधान पाकिस्तानला लक्ष्य करणार असल्याची चिंता पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीत आहेत. तर अफगाणिस्तानसाठी आपल्याला तळ नाकारणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी अमेरिका भारतामार्फत पाकिस्तानवर हल्ला चढविणार असल्याची भीती या देशातील काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. तर चीनची सरकारी माध्यमे भारताने अफगाणिस्तानबाबत अमेरिकेला सहाय्य करू नये, असा इशारा देत आहेत. तालिबानचे समर्थन करणार्‍या चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या या इशार्‍यांमुळे चीनची अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे.

leave a reply