केरळात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सात हजार डिटोनेटर्स जप्त

कोची – केरळातल्या वालायारमध्ये ‘डिस्ट्रीक्ट ॲन्टी नार्कोटिक्स स्पेशल ॲक्शन फोर्स’ (डीएएनएसएएफ) आणि वालायार पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७ हजार डिटोनेटर्स व ७५०० जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. राज्यात दहशतवादी मोठ्या घातपाताच्या तयारीत असल्याचे संकेत या कारवाईवरून मिळत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून दोघांचीही कसून चौकशी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेच्या केरळ युनिटचा प्रमुख ‘सिद्दीक उल अस्लिम’ला अटक केली होती.

केरळात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सात हजार डिटोनेटर्स जप्तसालेमहून आंगामलयला जाणाऱ्या टोमॅटोच्या लॉरीतून जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स नेत असल्याची खबर ‘डीएएनएसएएफ’च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा लावून या लॉरीमधून ७ हजार डिटोनेटर्स व ७५०० जिलेटिनच्या कांड्यांचा प्रचंड साठा वालायार येथे जप्त केला. हा साठा लॉरीतील ३४ बॉक्समध्ये लपविण्यात आला होता.

यावेळी ‘डीएएनएसएएफ’च्या अधिकाऱ्यांनी दोन जणांना अटक केली. रवी व प्रभू अशी स्फोटके घेऊन जाणाऱ्या दोघांची नावे आहेत. रवी तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील थम्मापेटमध्ये तर प्रभू थिरूवन्नामलाई जिल्ह्यातील कोट्टाव्वूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी या दोघांची चौकशी सुरू केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

गेल्या काही वर्षात ‘अल कायदा’ व ‘आयएस’सारख्या दहशतवादी संघटना केरळमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याची माहिती गुप्तचर तसेच तपासयंत्रणांच्या माध्यमातून उघड झाली होती. तपास यंत्रणांनी केरळमधून अनेक संशयित दहशतवादी तसेच समर्थकांना ताब्यात घेतल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त होणे लक्ष वेधून घेणारी घटना ठरते.

leave a reply