छत्तीसगडमधील चकमकीत पोलीस उपनिरीक्षक शहीद ; चार माओवादी ठार

रायपूर – छत्तीसगडच्या राजनांद गावामध्ये माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षकाला वीरमरण आले, तर चार माओवादी ठार झाले आहेत. यामध्ये दोन महिला माओवाद्यांचा समावेश असून चकमकीच्या ठिकाणावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

माओवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री या भागात शोध मोहीम हाती घेतली होती. रात्री साडे दहाच्या सुमारास राजनांद गावामध्ये पोलीस आणि माओवाद्यांचा अमानसामाना झाला. पोलिसांना पाहताच माओवाद्यांनी गोळीबार सुरु केला. पोलिसांनी माओवाद्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत उपनिरीक्षक श्यामकिशोर शर्मा हे शहीद झाले. तसेच चकमकीत चार माओवादी ठार झाले. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये दोन महिला माओवाद्यांचा समावेश आहे, अशी माहिती राजनांदगावचे पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांनी दिली. घटनास्थळावरून माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच एके-४७ रायफल, एसएलआर रायफल, दोन ३१५ बोर रायफलसह अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

माओवाद्यांनी राजनांदगावमध्ये रेड झोन तयार केला असून हा भाग छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. मागील काही दिवसात छत्तीसगडमध्ये माओवादी आणि सुरक्षादलामध्ये चकमकीच्या घटना समोर येत आहेत. २९ एप्रिल रोजी नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षादलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला होता. तर दोन जण जखमी झाले होते. २७ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांना ठार करण्यात आले होते. यासह १६ एप्रिल रोजी देखील चकमक झाली होती. दरम्यान, १२ जुलै, २००९ रोजी याच भागात माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पोलिस अधीक्षक व्ही के चौबे यांच्यासह २९ पोलीस शहीद झाले होते.

देशातून माओवाद्यांच्या संपूर्ण उच्चाटनासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. माओवाद्यांचा प्रभाव कायम असलेल्या भागांमध्ये मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यासाठी काही दिवसापूर्वी ‘आयटीबीपी’चे आठ हजार जवान कायमस्वरूपी तैनात करण्याचा निर्णय झाला होता. देशातील बऱ्याच भागातील माओवाद्यांचा प्रभाव कमी झाला आहे. माओवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली असताना माओवादी त्यांच्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत.

leave a reply