अमेरिकेतील भारतविरोधी प्रचाराला परराष्ट्रमंत्र्यांचे सडेतोड प्रत्युत्तर

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन – ‘कोरोनाची साथ आल्यानंतर अमेरिकन लोकसंख्येच्या अडीच पट भरेल इतक्या प्रमाणात भारत सरकारने आपल्या नागरिकांना मोफत अन्नाचा पुरवठा केला. अमेरिकेच्या जनसंख्येपेक्षाही अधिक प्रमाणात नागरिकांच्या खात्यात भारत सरकारने कुठलाही भेदभाव न करता पैसे ट्रान्सफर केले. हे कार्य करूनही काहीजण भ्रामक चित्र उभे करून एका विशिष्ट पद्धतीने भारताला बदनाम करण्याचा डाव आखत आहेत’, अशी चपराक परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लगावली. अमेरिकेच्या दौर्‍यावर दाखल झालेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॅक्मास्टर यांच्याबरोबरील चर्चेत भारतविरोधी अपप्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले.

भारतविरोधी प्रचारअमेरिकेच्या दौर्‍यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ‘हूवर इन्स्टीट्युशन’ या अभ्यासगटाने आयोजित केलेल्या ‘इंडिया: अपॉर्च्युनिटीज् अँड चॅलेंजेस फॉर अ स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ या चर्चासत्रात सहभाग घेतला. कोरोनाची साथ आल्यानंतर पाश्‍चिमात्य माध्यमांच्या एका गटाने भारतविरोधी प्रचाराचा धडाका लावला होता. भारताची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या साथीमुळे कोलमडल्याचे दावे माध्यमांच्या या गटाने सुरू केले होते. तसेच भारतातील परिस्थितीची अतिरंजित माहिती पाश्‍चिमात्य माध्यमांचा हा गट देत होता. त्याची दखल परराष्ट्रमंत्र्यांनी घेऊन या अपप्रचाराला प्रत्युत्तर दिले.

कोरोनाची साथ आलेली असताना भारतावर मोठा ताण आला आहे. पण अशा काळातही भारत सरकाने 80 कोटी जणांना मोफत अन्न पुरविले. कुठलाही भेदभाव न करता 40 कोटी जणांच्या बँक खात्यात भारत सरकारने पैसे ट्रान्सफर केले. हे कार्य करूनही भारताची भ्रामक प्रतिमा उभी करून बदनामी करण्याचे काम केले जात आहे, अशा थेट शब्दात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारतविरोधी प्रचारमोहीमेचा समाचार घेतला. त्याचवेळी आम्हा भारतीयांचा आमच्या लोकशाहीवर पूर्ण विश्‍वास आहे, असे सांगून पाश्‍चिमात्यांच्या अपप्रचाराची हवा परराष्ट्रमंत्र्यांनी काढून घेतली.

अमेरिकेत कोरोनाच्या साथीने सुमारे सहा लाखाहून अधिकजणांचा बळी घेतला आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या साथीसमोर हतबल झाल्याचे दिसत होते. श्रीमंत व विकसित असलेल्या युरोपिय देशांच्या आरोग्य यंत्रणा देखील कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोलमडून पडल्या होत्या. मात्र या काळात भारताच्या आरोग्य यंत्रणेने जबरदस्त कामगिरी केली होती व सार्‍या जगाला त्याची दखल घेणे भाग पडले होते. कोरोनाची दुसरी लाट अधिक भयंकर होती व त्याचा ताण भारताच्या यंत्रणांवर येत आहे. मात्र पाश्‍चिमात्य माध्यमांचा गट राजकीय व आर्थिक हेतू समोर ठेवून भारताच्या विरोधात अपप्रचाराची मोहीम राबवित असल्याचे सातत्याने समोर येत आहे.

सोशल मीडियावर भारताच्या विरोधातील अपप्रचाराच्या या मोहीमेला भारतीयांकडून उत्तर दिले जात आहे. कोरोनाने भारतापेक्षा अमेरिकेत कितीतरी अधिक प्रमाणात बळी घेतले आहेत. तरीही अमेरिकन माध्यमे आपल्या देशातले विदारक चित्र जगासमोर आणायला तयार नाहीत. उलट भारताची या साथीने दैना उडविल्याचे दावे करण्यात ही माध्यमे धन्यता मानत आहेत, यावर काही अमेरिकन विश्‍लेषकांनीही नाराजी व्यक्त केली होती. तर यामागे देशाच्या विरोधातील कारस्थान असल्याचा आरोप सोशल मीडियावर काही भारतीय करीत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अमेरिकेसहीत जगभरातील इतर देशांना केलेल्या सहाय्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळली होती. त्याला धक्का देणे हा या भारतविरोधी प्रचारमोहिमेचा हेतू असल्याचे आरोप सोशल मीडियावर होत आहेत.

leave a reply