ब्रिटनमध्ये जानेवारी २०२२ पर्यंत लॉकडाऊनची शक्यता

- रशियन वृत्तवाहिनीची माहिती

२०२२ पर्यंत लॉकडाऊनलंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी काही आठवड्यांपूर्वीच लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. तसेच पुढच्या दोन महिन्यात सर्व नियम काढले जातील, अशी घोषणा ब्रिटीश सरकारने केली आहे. पण दोन दिवसांपूर्वी ब्रिटन सरकारने जारी केलेल्या नव्या निविदांनुसार, २०२२ सालच्या जानेवारी महिन्यापर्यंत लॉकडाऊनची स्थिती कायम राहू शकते. रशियाच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

२६ एप्रिल रोजी ब्रिटनच्या सरकारने ६० नव्या ‘कोव्हिड मार्शल’साठी निविदा जारी केली होती. ब्रिटनची सुरक्षा यंत्रणा, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी या कोव्हिड मार्शलची मदत घेतली जाते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कोव्हिड मार्शलचा सहाय्यक म्हणून वापर सुरू झाला आहे. यामुळे ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणेवरील ताण बराचअंशी कमी झाल्याचा दावा केला जातो. या कोव्हिड मार्शलना कायदेशीर मान्यता नसली तरी त्यांना दिलेल्या अधिकारांना सर्वच स्तरातून मान्यता मिळालेली आहे.

२०२२ पर्यंत लॉकडाऊनयासाठी जारी करण्यात आलेल्या निविदांनुसार, जुलै २०२१ ते जानेवारी २०२२ अशा सात महिन्यांपर्यंत या कोव्हिड मार्शलची आवश्यकता लागणार असल्याचे, रशियन वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच ब्रिटनने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता जाहीर केली आहे.

१२ एप्रिलपासून दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. पण १७ मे पर्यंत मोठमोठ्या सभा किंवा समारंभावरील बंदी कायम असणार आहे. २१ जूनपर्यंत ब्रिटन सरकार सर्व नियम काढून टाकणार आहे. अशा परिस्थितीत, रशियन वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेली बातमी लक्षवेधी ठरत आहे.

ब्रिटन सरकारने अद्याप या बातमीची दखल घेतलेली नाही. पण ब्रिटनमधील प्रसिद्ध बिग बेन आणि ब्रिटिश संसदेचे एलिझाबेथ टॉवर खुले करण्याची मुदत देखील वाढविण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून बिग बेन आणि टॉवर डागडुजीसाठी बंद करण्यात आले होते. या वर्षीच या दोन्ही वास्तू जनतेसाठी पुन्हा खुल्या केल्या जाणार होत्या. पण कोरोनामुळे या कामाला विलंब लागल्याचे बोलले जाते. या दोन्ही वास्तू देखील २०२२ सालापर्यंत खुल्या केल्या जातील, अशी माहिती ब्रिटिश माध्यमे देत आहेत.

leave a reply