कोरोनाची तिसरी लाट येण्याचीही शक्यता

- केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने भीती व्यक्त केली

नवी दिल्ली – देेशात सध्या १२ राज्यांमध्ये कोरोनाचे लाखांहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असताना कोरोनाची तिसरी लाटही अटळअसल्याची भीती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता आरोग्य व्यवस्था आणखी सक्षम कराव्या लागतील, असे आरोग्य मंत्रालयाने अधोरेखित केले.

सध्या देशात दिवसाला कोरोनाचे पावणेचार लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच साडे तीन हजाराहून अधिक जण या साथीमुळे एका दिवसात दगावत आहेत. काही राज्यांमध्ये कोरोनाने आपले शिखर गाठले असून तेथे आता रुग्णांच्या संख्येत घट दिसू लागल्याचे संकेत मिळत आहेत. तर काही राज्यांमध्ये कोरोनाची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहेत. यामध्ये कर्नाटक, केरळ यासारख्या राज्यांचा समावेश आहे.

बुधवारी कर्नाटकात तब्बल ५० हजार नवे रुग्ण आढळले, तसेच ३४६ जण दगावले. केरळमध्ये ४२ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. उत्तर प्रदेशातही ३५७ जणांचा बळी गेला आहे, तर ३१ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात गेले तीन दिवस रुग्णसंख्येत थोडी घट दिसून आली होती. मात्र बुधवारी राज्यात ५७ हजार नवे रुग्ण आढळले, तर ९२० जणांचा बळी गेला. या सर्व राज्यांनी नव्या रुग्णांनी जाहीर केलेली ही आकडेवारी पाहता चोवीस तासात देशात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या चार लाखांवर, तर मृत्यूंची संख्या ४ हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविली जाते.

या पार्श्‍वभूमीवर आता कोरोनाची तिसरी लाटही येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयांनी माध्यमांसाठी आयोजित केलेल्या परिषदेत केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनीच याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या साथीची तिसरी लाट येणे अटळ असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र ही लाट कधी येईल याबाबत निश्‍चित वेळ सांगता येणार नाही. तसेच ही लाट किती काळ राहिल, याबाबतही शक्यता व्यक्त करणे अशक्य आहे. मात्र ही लाट येईल, असे राघवन म्हणाले.

तसेच भारतीय लसी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळातही कोरोनाचे नवे स्ट्रेन येतील. जगभरात असे स्ट्रेन सापडतील, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी नीति आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी डॉक्टरांना टेलिकन्सल्टिंगद्वारे कोरोना रुग्णांना घरातच उपाचार घेणासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच सरकार देशभरात आरोग्य सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी सातत्याने काम करीत असल्याचे पॉल म्हणाले.

leave a reply