चीनमधील वीजटंचाईमुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला धक्के बसण्याची शक्यता

- विश्‍लेषक व प्रसारमाध्यमांचा इशारा

बीजिंग – चीनमध्ये सुरू असलेल्या वीजटंचाईचे तीव्र परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर दिसून येतील, असा इशारा विश्‍लेषक व माध्यमे देत आहेत. चीनमधील सुमारे २०हून अधिक प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर वीजटंचाई जाणवत असून हजारो कंपन्या व कारखान्यांचा वीजपुरवठा घटविण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादनक्षेत्राला मोठा फटका बसला असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरवठा साखळी खंडित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

चीनमधील वीजटंचाईमुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला धक्के बसण्याची शक्यता - विश्‍लेषक व प्रसारमाध्यमांचा इशाराचीनमधील वीजनिर्मितीत ६० टक्क्यांहून अधिक वाटा कोळशाचा आहे. गेल्या वर्षी चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात व्यापारयुद्ध छेडून ऑस्ट्रेलियातून येणार्‍या कोळशावर निर्बंध लादले होते. ऑस्ट्रेलियातून चीनला पोहोचलेली कोळशाची जहाजे जाणूनबुजून रोखून ठेवण्यात आल्याचेही समोर आले होते. याचा मोठा फटका चीनला बसत आहे. चीनने इतर देशांकडून कोळशाची आयात सुरू केली होती. मात्र त्याचे दर जास्त असल्याने चीनमधील वीजनिर्मिती कंपन्या अडचणीत आल्या आहेत.

कोळशाचे दर वाढल्यामुळे वीजनिर्मितीचा खर्चही वाढला; पण सरकारी नियमांमुळे कंपन्यांना दरवाढीची परवानगी नाही. कमी दरात वीजपुरवठा शक्य नसल्याने देशातील काही प्रकल्पांनी कोळशावर आधारित वीजनिर्मिती कमी तसेच बंद करण्याचा निर्णय घेतला. वीजनिर्मिती कमी होत असतानाच कारखाने व कंपन्यांकडून वीजेची मागणी वाढण्यास सुरुवात झाली. घरगुती पातळीवरही चीनमधील वीजेची मागणी दशकातील सर्वोच्च पातळीवर गेल्याचे समोर आले आहे. वीजेची निर्मिती घटलेली व वापर वाढलेला अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे चीनमधील ऊर्जापुरवठ्याचे समीकरण चांगलेच बिघडले आहे.

ऑक्टोबर महिन्यात समोर आलेल्या माहितीनुसार चीनमधील सुमारे २० प्रांतांमध्ये वीजटंचाईच्या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. या प्रांतांमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत असून शेकडो उद्योगांनी आपले व्यवहार थांबविले आहेत. काही प्रांतांमध्ये स्थानिक प्रशासनांकडून कारखान्यांना वीजकपातीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मागणी व निर्यात वाढत असतानाच वीजटंचाई उद्भवल्याने अनेक कंपन्यांना नियोजित वेळेत निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.

चीनमधील वीजटंचाईमुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला धक्के बसण्याची शक्यता - विश्‍लेषक व प्रसारमाध्यमांचा इशाराचीनमधील या परिस्थितीचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू लागले असून जागतिक अर्थव्यवस्थेला धक्के बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कपडे, खेळणी, यंत्रसामुग्रीसह अनेक क्षेत्रांना चीनकडून घटणार्‍या पुरवठ्याचा फटका बसेल, असे भाकित नोमुरा होल्डिंग्जच्या अर्थतज्ज्ञांनी केले आहे. अमेरिकी विश्‍लेषक माईक बेकहॅम यांनी, चीनमधील वीजटंचाईच्या समस्येचे नकारात्मक व अनपेक्षित परिणाम होतील, असे बजावले. चीनमधून होणार्‍या निर्यातीवर परिणाम झाल्यास अमेरिकेतील अनेक उत्पादनांच्या किंमती १५ टक्क्यांहून अधिक वाढतील, असा दावाही बेकहॅम यांनी केला.

चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून गेल्या काही महिन्यात तंत्रज्ञान व रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी कारवाई सुरू आहे. त्यातच वीजटंचाईची समस्या तीव्र झाल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी हा ‘दुहेरी फटका’ ठरु शकतो, असा दावा सिंगापूरमधील विश्‍लेषक बो झुआंग यांनी केला. चीनच्या अर्थव्यवस्थेत अधिक घसरण होण्याची शक्यता असून ती टाळता येण्याजोगी नाही, असेही झुआंग यांनी बजावले. चीनच्या सत्ताधार्‍यांनी प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी पोलाद तसेच रसायन कंपन्यांना आपले उत्पादन घटविण्याचे निर्देश दिले आहेत. चीनमधील उत्पादनक्षेत्राचा निर्देशांक घसरत असल्याकडेही पाश्‍चात्य माध्यमांनी लक्ष वेधले आहे.

leave a reply