तालिबानची सरकार स्थापनेची तयारी

- याकूब आणि हक्कानी गटामध्ये तीव्र मतभेद

याकूबकाबुल – अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानचा ताबा घेणाऱ्या तालिबानकडे साऱ्या जगाच्या नजरा खिळलेल्या आहेत. अफगाणिस्तानात सरकार स्थापनेसाठी तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये प्रदिर्घ चर्चा सुरू आहे. तालिबानचा प्रमुख मुल्लाह अखुंदझदा, दुसऱ्या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर तसेच मुल्ला याकूब आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्याकडे महत्त्वाचे मंत्रीपद मिळत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी याकूब आणि पाकिस्तानसमर्थक हक्कानी या दोन गटांमधील तीव्र मतभेद यानिमित्ताने समोर आले आहेत. सध्याच्या स्थितीत या दोन्ही गटामध्ये यावरून संघर्ष पेटणार नाही, पण यामुळे तालिबानमधील अंतर्विरोध यामुळे जगासमोर आलेला आहे.

गेल्या महिन्यात राजधानी काबुलचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने हंगामी सरकार स्थापन केले होते. पण सोमवारी मध्यरात्री अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानने सरकार स्थापनेची प्रक्रिया जलद केली आहे. तालिबानचा प्रमुख मुल्लाह हैबतुल्ला अखुंदझदा याच्याकडे देशाचे राष्ट्राध्यक्षपद देणार असल्याचे निश्‍चित झाले. तर तालिबानचा सहसंस्थापक आणि दुसऱ्या क्रमांकाचा नेता मुल्ला गनी बरादर याच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचे खाते असेल.

तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमरचा मुलगा मुल्ला याकूब याला संरक्षणमंत्रीपद दिले जाईल. तर गेल्या काही दिवसांपासून काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला तालिबानमधील सर्वात मोठा गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी याला अंतर्गत सुरक्षामंत्री केल्याची माहिती समोर येत आहे. पण सिराजुद्दीन हक्कानीला दिलेल्या या जबाबदारीवर मुल्ला याकूब नाखूश असल्याच्या बातम्या येत आहेत.

हक्कानी नेटवर्कचे मुख्य तळ पाकिस्तानात असून कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ या संघटनेशी हक्कानी नेटवर्कचे जुने सहकार्य आहे. या गटाच्या निष्ठा अफगाणिस्तानशी नाही तर पाकिस्तानशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील मंत्रीमंडळात सिराजुद्दीन हक्कानीला दिलेले स्थान मुल्ला याकूब याला मान्य नाही.

गेल्या काही महिन्यांपासून तालिबानने अफगाणिस्तानात सुरू केलेल्या हल्ल्यांत मुल्ला याकूबच्या गटाने कंदहार व दक्षिण अफगाणिस्तानातील महत्त्वाच्या भागांचा ताबा घेतला होता. त्यावेळी याकूबच्या समर्थकांनी काही ठिकाणाहून हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांना पिटाळून लावल्याच्या बातम्या आल्या होत्या.
तालिबानच्या वेगवेगळ्या गटांमध्ये लवकरच संघर्ष पेटण्याची दाट शक्यता असल्याचे इशारे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक देत आहेत. अशा परिस्थितीत याकूब व हक्कानी गटातील तीव्र मतभेद अफगाणिस्तानात नवा संघर्ष पेटविणारे ठरण्याची शक्यता समोर येत आहे.

leave a reply