राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची मोसादच्या प्रमुखांशी चर्चा

वॉशिंग्टन – इस्रायलची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे प्रमुख योसी कोहेन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात चर्चा पार पडली. मोसादच्या प्रमुखांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी इराणच्या अणुकार्यक्रमाबात चर्चा केल्याची बातमी इस्रायली वृत्तवाहिनीने दिली. तर बायडेन यांनी कोहेन यांची फक्त भेट घेतल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

इराणबरोबरच्या अणुकराराबाबत इस्रायलला वाटत असलेली चिंता व नेत्यान्याहू सरकारची परखड भूमिका मांडण्यासाठी इस्रायलचे वरिष्ठ शिष्टमंडळ गेले काही दिवस अमेरिकेच्या दौर्‍यावर होते. यामध्ये इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिर बेन-शबात, मोसादचे प्रमुख योसी कोहेन आणि लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख तमिर हेमॅन यांचा समावेश होता. यापैकी मोसादच्या प्रमुखांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिवन यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मोसादच्या प्रमुखांची भेट घेऊन इस्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले. पण बायडेन आणि कोहेन यांच्यात इराणबाबत चर्चा झाल्याचे इस्रायली वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. इराणचा अणुकार्यक्रम आणि इस्रायलच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान नेत्यान्याहू यांची भूमिका मोसादच्या प्रमुखांनी बायडेन यांच्याबरोबरच्या चर्चेत मांडल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

leave a reply