रशियाने केलेल्या सहाय्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार

आभारनवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या फोनवरून चर्चा पार पडली. भारत कोरोनाच्या साथीचा सामना करीत असताना, रशिया करीत असलेल्या सहकार्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानले. रशियानेही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली असून या लसीची निर्मिती भारतात केली जात आहे. यामुळे भारताच्या लसीकरणाच्या मोहिमेला अधिक वेग मिळेल. कोरोनाच्या लसीसाठी लागणारा कच्चा माल पुरविण्यास अमेरिकेने दिलेल्या नकाराच्या पार्श्‍वभूमीवर, रशियाने भारताला केलेले हे सहकार्य नजरेत भरणारे आहे. आता अमेरिकेने ही बंदी मागे घेतली असली, तरी भारताच्या रशियाबरोबरील सहकार्याला पर्याय नाही, ही बाब यामुळे नव्याने अधोरेखित झाली आहे.

या साथीचे संकट आलेले असताना, रशियाकडून भारताला त्वरित सहकार्य पुरविण्यात आले, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानले. रशियाचे हे सहकार्य म्हणजे दोन्ही देशांच्या भक्कम भागीदारीचे प्रतिक असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांनी याची माहिती दिली आहे. रशियाच्या ‘स्फुटनिक-५’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीबाबत भारत-रशियाचे सहाय्य या साथीविरोधातील लढ्यात सार्‍या मानवतेला सहाय्य करणारे ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

रशियाच्या या लसीला भारतानेही मान्यता दिली असून भारतीय कंपनी याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार आहे. यामुळे भारतातील लसीकरणाची मोहीम अधिक गतीमान बनेल. तसेच इतर देशांनाही ही लस पुरविणे शक्य होऊ शकेल. या सहकार्यावर पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची चर्चा झाली. तसेच भारताच्या गगनयान मोहिमेसाठी रशिया करीत असलेल्या सहकार्याचीही पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. भारताच्या चार अंतराळविरांना रशियाने प्रशिक्षण दिले असून नुकतेच हे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

दरम्यान, भारत व रशियामध्ये लवकरच टू प्लस टू चर्चा सुरू करण्यावरही पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे एकमत झाले. दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री या चर्चेत सहभागी होतील. यामुळे भारत व रशियामधील द्विपक्षीय धोरणात्मक सहकार्य अधिकच गतीमान होईल. यामुळे भारताचे रशियाबरोबरील संबंध अधिकच दृढ बनतील. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांचे संबंध काही प्रमाणात ताणले गेल्याचे उघड झाले होते. भारताने अमेरिकाप्रणित व चीनविरोधी क्वाड संघटनेत सहभागी होऊ नये, अशी रशियाची अपेक्षा आहे. तर रशियाने भारताच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना सहाय्य करू नये, असे भारताचे म्हणणे आहे. मात्र याबाबतचे मतभेद कायम असले तरी त्याचा द्विपक्षीय सहकार्यावर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही भारत व रशियन नेते सातत्याने देत आले आहेत.

भारतात कोरोनाचे संकट भयंकर स्वरुप धारण करीत असताना, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर बंदी घातली होती. भारताची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला होता. यावर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली व अमेरिकेवर विश्‍वास ठेवता येणार नाही, ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली होती. पण काही दिवसातच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना हा निर्णय मागे घेऊन भारताला आवश्यक असलेले सारे सहाय्य पुरविण्याचा निर्णय घ्यावा लागला. सध्या अमेरिका आधीच्या निर्णयामुळे झालेली हानी भरून काढण्याचा शर्थीचा प्रयत्न करीत आहे. मात्र अशा संकटाच्या काळात रशियाकडून भारताला मिळालेले सहकार्य दोन्ही देशांच्या मैत्रिपूर्ण संबंधांचे महत्त्व नव्याने अधोरेखित करीत आहे.

leave a reply