युरोपात शिरणार्‍या आफ्रिकन निर्वासितांची समस्या भीषण बनेल

- संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

लंडन – युरोपमध्ये शिरण्यासाठी जीवाची पर्वा न करणार्‍या निर्वासितांच्या संख्येत फार मोठी वाढ होत आहे. आफ्रिकेच्या साहेल क्षेत्रातील हिंसाचार आणि अराजक यामुळे युरोपात दाखल होऊ पाहणार्‍या निवासितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितविषयक विभागाच्या प्रवक्त्या कार्लोटा समी यांनी दिला. या वर्षी युरोपात शिरण्याच्या प्रयत्नात ४५३ जणांनी जीव गमावला आहे. तर अवैध मार्गाने युरोपच्या इटलीमध्ये शिरणार्‍या आफ्रिकन घुसखोर निर्वासितांची संख्या यावर्षी तिपटीने वाढली आहे. त्यामुळे पुढच्या काळात युरोपला या निर्वासितांची गंभीर समस्या भेडसावणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

माली, नायजेर, चाड, बुर्किना फासो आणि उत्तर नायजेरिया या आफ्रिकेच्या साहेल क्षेत्राचा भाग असलेल्या देशांमध्ये या देशांचे सरकार आणि दहशतवाद्यांमध्ये घनघोर संघर्ष सुरू आहे. त्यातच या दहशतवादी संघटनांनी स्थानिक पातळीवरील वांशिक गटांमधील वैराचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे परिस्थिती भयावह बनत चालली आहे. या हिंसाचार, अराजक आणि उपासमारी यांनी हैराण झालेले हजारोजण आफ्रिकेच्या उत्तरेकडील किनार्‍यावरून निर्वासित युरोपच्या दिशेने धाव घेत आहेत. याचा लाभ तस्कर उचलत असून खचून भरलेल्या निर्वासितांच्या बोटी लिबियामार्फत युरोपच्या किनार्‍यासाठी निघत आहेत.

अशा बोटी उलटून युरोपमध्ये दाखल होणार्‍या निर्वासितांनी जीव गमावल्याची विदारक उदाहरणे समोर आली आहे. या वर्षी ४५३ जणांनी या प्रयत्नात जीव गमावला आहे. जीवाची जोखीम पत्करूनही आम्ही युरोपमध्ये जायला तयार आहोत, असे आफ्रिकन निर्वासित माध्यमांना सांगत आहेत. कारण आफ्रिकेच्या साहेल क्षेत्रात दहशतवादी संघटना आणि या देशातील सरकारांमध्ये सुरू असलेल्या घनघोर संघर्ष तसेच वांशिक गटांमधील हिंसाचाराने इथली परिस्थिती भीषण बनविली आहे. त्यामुळे सुरक्षा आणि पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हे निर्वासित आपल्यासह आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता युरोपमध्ये शिरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितविषयक विभागाच्या प्रवक्त्या कार्लोटा समी यांनी याबाबत गंभीर इशार दिला असून पुढच्या काळात ही समस्या अधिकच भेसूर स्वरुप धारण करील, असे बजावले आहे. गेल्या वर्षी याच काळात इटलीत अवैधरित्या शिरकाव करणार्‍या निर्वासितांची संख्या ३,४५१ इतकी होती. मात्र या वर्षी घुसखोर निर्वासितांची संख्या नऊ हजारांच्या पुढे गेलेली आहे. ही बाब निर्वासितांचे आव्हान अधिकच भीषण बनणार असल्याचे दाखवून देत आहे. युरोप गाठायचा किंवा मृत्यू पत्करायचा, हे ठरवून प्रवास करीत असलेल्या निर्वासितांना रोखणे युरोपिय देशांसाठी अधिकाधिक अवघड बनेल. त्यामुळे निर्वासितांची ही समस्या सोडविण्यासाठी युरोपिय देशांना अधिक व्यापक स्तरावर प्रयत्न करावे लागतील, याची जाणीव विश्‍लेषकांकडून करून दिली जात आहे.

तर युरोपिय देशांमधील उजव्या गटाचे राष्ट्रवादी नेते निर्वासितांची वाढती संख्या युरोपिय देशांची मूळ ओळख पुसून टाकील, अशी चिंता व्यक्त करीत आहेत.

leave a reply