रशियात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या

- पाच हजारांहून अधिक निदर्शकांना अटक

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या एकतर्फी कारभाराला आव्हान देणार्‍या आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण केले आहे. रविवारी राजधानी मॉस्कोसह अनेक शहरांमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून ‘रशिया विदाउट पुतिन’, ‘पुतिन इज ए थिफ’ अशा घोषणा देत आपली नाराजी व्यक्त केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात सलग दोन आठवडे निदर्शने सुरू असून रशियातील लोकशाहीवादी गटांनी मंगळवारी पुन्हा एकदा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. रशियातील सुरक्षायंत्रणांनी आंदोलनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत सुमारे पाच हजारांहून अधिक जणांना अटक केली.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक म्हणून ओळखण्यात येणारे अ‍ॅलेक्सी नॅव्हल्नी यांना गेल्या महिन्यात तुरुंगात टाकण्यात आले आहे. आपल्याविरोधात रशियन राजवटीकडून सुरू असणारी कारवाई चुकीची असल्याचा दावा करून नॅव्हल्नी यांनी आपल्या समर्थकांना निदर्शने छेडण्याचे आवाहन केले होते. अ‍ॅलेक्सी नॅव्हल्नी यांना मंगळवारी नवी शिक्षा जाहीर करण्यात येईल, असे संकेत रशियन सूत्रांनी दिले आहेत. त्याविरोधात रशियन नागरिक रस्त्यावर उतरले असून नॅव्हल्नी यांच्या सुटकेची मागणी लावून धरण्यात आली आहे.

रविवारी राजधानी मॉस्कोसह रशियातील विविध शहरांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरून पुतिन यांच्याविरोधात घोषणा देत असल्याचे चित्र पहायला मिळाले. या निदर्शकांविरोधात रशियन सुरक्षायंत्रणांनी आक्रमक कारवाई करताना मोठ्या प्रमाणात लाठीमार व अश्रुधुराचा वापर केला. राजधानी मॉस्कोमध्ये नॅव्हल्नी यांची पत्नी युलियासह दीड हजार निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले. त्याव्यतिरिक्त देशातील विविध शहरांमधून सुमारे पाच हजारांहून अधिक जणांना अटक झाल्याची माहिती स्थानिक गटांनी दिली. रशियन सुरक्षायंत्रणांकडून निदर्शकांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, रशियातील निदर्शकांवर झालेल्या कारवाईविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमेरिका व ब्रिटनने नॅव्हल्नीसह अटक केलेल्या समर्थकांची ताबडतोब सुटका करावी, अशी मागणी केली आहे. नॅव्हल्नी यांच्या समर्थकांनी अमेरिकेसह इतर पाश्‍चात्य देशांनी रशियावर नवे निर्बंध लादण्याचे आवाहन केले आहे.

leave a reply