उघुरवंशीय इस्लामधर्मियांवर अत्याचार करणाऱ्या चीनविरोधात बांगलादेशमध्ये निदर्शने

ढाका – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून उघुरवंशीयांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात शुक्रवारी बांगलादेशमधील नागरिकांकडून राजधानी ढाकामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. चीनमध्ये उघुरवंशीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमेरिकेसह युरोपीय देशांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्याचे पडसाद इतर छोट्या देशांमध्येही उमटू लागल्याचे बांगलादेशमधील निदर्शनांमधून दिसून येते.

उघुरवंशीय इस्लामधर्मियांवर अत्याचार करणाऱ्या चीनविरोधात बांगलादेशमध्ये निदर्शनेगेल्या काही वर्षात चीनमध्ये उघुरवंशीयांचा छळ करण्यात येत असून त्यांना शिबिरांमध्ये डांबून ठेवण्यात येत आहे. चीनच्या झिंजियांग प्रांतात लाखो उघुरवंशीयांना डांबुन ठेवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक मानवाधिकार संघटना उघुरवंशीयांवर होत असलेले अत्याचार थांबविण्याची मागणी करीत आहेत. मात्र उघुरवंशीयांची धरपकड व छळवणुकीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. उघुरवंशीयांवर होत असलेल्या या अत्याचारांविरोधात बांगलादेशमधील नागरिकांकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘बांगलादेश फ्रिडम फायटर्स’ गटाकडून ‘उघुर रिप्रेशन डे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बांगलादेशी नागरिकांकडून चीनविरोधात घोषणाही देण्यात आल्या.

२०१८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात चीनने तब्बल ११ लाख उघुरवंशियांना छळछावण्यांमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला होता. या अहवालानंतर, पाश्‍चिमात्य देशांनी उघुरांच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. मात्र चीनने उघुरवंशीय नागरिकांना छावण्यांमध्ये डांबून ठेवण्यात येत नसून, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे दावे केले होते. मानवाधिकार गटांच्या दाव्यानुसार, शिबिरांतील बहुतेक नागरिकांवर कधीही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या अटकेला आव्हान देण्याचा कायदेशीर मार्गच चीनच्या राजवटीने उपलब्ध ठेवला नसल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. चीन करीत असलेले दावे पूर्णपणे खोटे असल्याचे यातून उघड होत आहे.

चीन उघुरवंशीयांवर अनन्वित अत्याचार करीत असताना जगभरातील इस्लामिक देश मात्र या प्रकरणी चीनच्या विरोधात भूमिका घेण्यास कचरत असल्याची टीका अमेरिकेने केली होती. काही प्रमाणात तुर्कीचा अपवाद वगळता इतर कुठल्याही देशाने अधिकृत पातळीवर चीनचा निषेध नोंदविलेला नाही. इस्लामधर्मीय देशांचे नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या पाकिस्ताननेही याबाबत चीनच्या विरोधात चकार शब्द काढलेला नाही. मात्र बांगलादेशमधील निदर्शनांमुळे इस्लामधर्मीय जनता चीनच्या विरोधात उभी राहू लागल्याचे दिसत आहे. याचा दबाव बांगलादेशा सरकारवर येऊ शकतो. चीन बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक करून या देशाचा वापर भारताविरोधात करू पाहत आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी ढाकात झालेली निदर्शने चीनला धक्का देणारी आहेत.

leave a reply