पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील चर्चेत क्वाडच्या सहकार्याला विशेष महत्त्व दिले जाईल

- अमेरिकन विश्‍लेषकांचा दावा

वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिकेच्या दौर्‍यात राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेणार असून त्यानंतर क्वाडच्या राष्ट्रप्रमुखांच्या पहिल्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी होणार आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे स्थैर्य व सहकार्य ही अमेरिकेसमोरील प्राथमिकता असेल, असे अमेरिका वारंवार सांगत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे औचित्य साधून बायडेन यांनी आयोजित केलेली ही क्वाडची बैठक अमेरिकेच्या या प्राथमिकतेचा भाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चीनने या बैठकीवर आधीच नाराजी व्यक्त केली होती.

पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील चर्चेत क्वाडच्या सहकार्याला विशेष महत्त्व दिले जाईल - अमेरिकन विश्‍लेषकांचा दावाअफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार, आपल्या चीन व रशिया या प्रतिस्पर्धी देशांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या सैन्यमाघारीच्या निर्णयाचे समर्थन केले होते. अमेरिकेचे काही मुत्सद्दी व विश्‍लेषक देखील अफगाणिस्तान, इराक, सिरिया या देशांकडून लक्ष वळवून अमेरिका चीन व रशियापासून असलेल्या धोक्यांकडे लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगत आहे. क्वाडच्या राष्ट्रप्रमुखांच्या प्रत्यक्ष बैठकीचे आयोजन करून बायडेन यांनी आपला प्राधान्यक्रम स्पष्ट केल्याचा दावा हे मुत्सद्दी व विश्‍लेषक करीत आहेत. याचा फार मोठा लाभ भारताला मिळेल, असे युएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी म्हटले आहे.

भारत व अमेरिका हे क्वाडचे समर्थ सदस्यदेश असून या दोन्ही देशांना इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांची व त्यांना असलेल्या धोक्यांची स्पष्टपणे जाणीव झालेली आहे. या धोक्यांच्या विरोधात आपले सहकार्य अधिक भक्कम करण्याची तयारीही या दोन्ही देशांनी केलेली आहे, असा दावा अघी यांनी केला. तर ‘ऑर्बझव्हर रिसर्च फाऊंडेशन अमेरिका’चे कार्यकारी अध्यक्ष ध्रूव जयशंकर यांनी क्वाडच्या समविचारी सदस्यदेशांमधील सहकार्य कृतशील करणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचा दावा केला. कोरोनाप्रतिबंधक लसींचे वितरण तसेच अन्य उपक्रमांद्वारे हे सहकार्य कृतीशील बनू शकेल. तसेच सागरी सुरक्षेसंबंधीचा आराखडा विकसित करून त्यावर काम करण्यासाठीही क्वाडला पावले टाकावी लागतील, असे जयशंकर म्हणाले.

चीनने बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह या आपल्या प्रकल्पाद्वारे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील छोट्या देशांनाही आपल्या कर्जाच्या फासात अडकविण्याची तयारी केली आहे. क्वाडद्वारे चीनच्या या प्रकल्पाला पर्याय देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. बायडेन यांनी आयोजित केलेल्या क्वाडच्या चर्चेत याला महत्त्व दिले जाईल. तसेच सागरी सुरक्षेला आव्हान देणार्‍या चीनला रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना व क्वाडच्या सहकार्यावर या बैठकीत सर्वाधिक भर दिला जाणार आहे. याचे परिणाम आत्तापासूनच दिसू लागले असून चीन क्वाडच्या बैठकीवर सडकून टीका करू लागला आहे.

leave a reply