‘लॉकडाऊन’मध्ये रेल्वेकडून देखभाल व दुरूस्तीच्या कामांना वेग

- १२ हजार २७० किलोमीटर मार्गावरील मेन्टेनन्स काम पूर्ण

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने ‘लॉकडाऊन’चा वापर बराच काळ प्रलंबित असलेल्या देखभाल व दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी केला आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात आतापर्यंत १२ हजार २७० किलोमीटर मार्गावरील देखभालीची कामे पूर्ण केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

देशात २५ मार्च पासून ‘लॉकडाऊन’ असून भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यादांच रेल्वे सेवा पूर्णतः बंद आहे. यामुळे भारतीय रेल्वेला मोठे नुकसान उचलावे लागत आहे. मात्र त्याचवेळी भारतीय रेल्वेने याकडेही संधी म्हणून पाहत वीज यंत्रणा, रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा, गटारे- नाले सफाई, तसेच इतर प्रलंबित कामे पूर्ण करायला घेतली आहेत. रेल्वेकडून रूळ दुरूस्तीसाठी ५०० आधुनिक हेवी ड्युटी ट्रॅक मेन्टेनन्स मशीनचा वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत १२ हजार २७० किलोमीटर मार्गावरील सिग्नल आणि ओव्हरहेड इक्विपमेंट्सची (ओएचई) कामे झाली आहेत. यामध्ये सिग्नल युनिट बदलणे, सीएसएमटी येथे पॉवर पॅनेल व लाइटिंग पॅनेलमधील जोडण्याची, बोगद्याच्या स्कॅनगची कामेसुद्धा करण्यात आली आहेत.

रेल्वे मार्गावर बरीचशी कामे कित्येक वर्षापासून प्रलंबित होती. आम्ही लॉकडाऊनच्या काळात एक संधी म्हणून त्याकडे पाहिले आणि रेल्वे मार्गावरची देखभाल व दुरूस्तीची कामे सुरू केली, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. या कामांमध्ये रेल्वे यार्ड दुरूस्ती, जुन्या पुलाची दुरूस्ती, नव्या पुलाची उभारणीची कामे करण्यात येत आहेत. तसेच २० हजार जुन्या डब्यांचे आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई व उपनगरीय मार्गावर देखभाल दुरूस्तीची कामे सुरू आहेत. यात कर्जतमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असल्याने, त्याची दुरुस्ती झाली आहे. त्याचप्रमाणे दादर, भायखळा, घाटकोपर स्थानकांवरील छपरांची दुरुस्ती करण्यात आली आहे; तर छपरावरील पडणाऱ्या सांडपाण्याचीही विल्हेवाट लावण्यासाठी गटारांची साफसफाई, कुर्ला क्रॉसिंगवरील पाईपलाइनची दुरुस्ती, कळवा येथे पाईपलाइन आणि भूमिगत नाल्यांची दुरुस्ती व 800 झाडांची छाटणीचे काम करण्यात आले आहे. आतापर्यंत 33 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची नालेसफाई करण्यात आली आहे.

मुंबई विभागातील सिग्नल यंत्रणा तपासून संपूर्ण केबलची तपासणी झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर रेल्वेची सेवा सुरू झाल्यास या कामासाठी वेगळा मेगाब्लॉक घेण्याची गरज पडणार नसल्याने रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखर व सुरक्षित होणार आहे.

leave a reply