कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेतच तयार करण्यात आला – अमेरिकेच्या दोन संशोधकांचा दावा

वॉशिंग्टन – कोरोनाचा विषाणू मानवनिर्मित असल्याची ग्वाही अमेरिकेच्या आणखी दोन संशोधकांनी दिली. कोरोनाच्या जिनोमचा अभ्यास केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर हे स्पष्टपणे मांडता येऊ शकते, असे या अमेरिकन संशोधकांनी म्हटले आहे. यामुळे चीनच्या वुहान प्रयोगशाळेतच कोरोनाचा विषाणू तयार करण्यात आल्याच्या आरोपांना अधिकच बळ मिळाले आहे. आधीच्या काळात काही संशोधकांनी, जागतिक आरोग्य संघटनेने व अमेरिकेचे आरोग्यविषयक सल्लागार डॉ. फॉसी यांनीही कोरोनाचा विषाणू नैसर्गिक असल्याचा निर्वाळा दिला होता. पण आता मान्यताप्राप्त संशोधक कोरोनाबाबत वेगळी माहिती देऊ लागले असून त्यांचे म्हणणे नाकारणे चीनचा बचाव करू पाहणार्‍यांसाठी अधिकाधिक अवघड बनत चालले आहे.

कोरोनाचा विषाणूअमेरिकेत डॉ. फॉसी यांची आरोग्यविषयक सल्लागार पदावरून हकालपट्टी करा, त्यांची चौकशी करा, अशी मागणी जोर पकडत आहे. अमेरिकन संसदेच्या सदस्यांनीही तशी मागणी केली आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर डॉ. फॉसी यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. माहिती असूनही जाणीवपूर्वक डॉ. फॉसी यांनी कोरोनाची खरीखुरी माहिती दडवून ठेवली व अमेरिकेला अंधारात ठेवले, असे आरोप अमेरिकन वृत्तवाहिन्या करीत आहेत. तसेच अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची साथ चीनने पसरविल्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष केल्याची मोठी किंमत देशाचा चुकती करावी लागत असल्याची जळजळीत टीका काही अमेरिकन्स करीत आहेत.

अशा परिस्थितीत वुहान लॅब लीकच्या थिअरीला दुजोरा देणारी नवनवीन माहिती समोर येत आहे. डॉ. स्टिफन कुवे आणि रिचर्ड म्युलर या दोन संशोधकांनी एका अमेरिकन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाचा विषाणू मानवनिर्मित असल्याचे सांगून तो कारस्थानाचा भाग असल्याचा दावा केला. कोरोनाचे ‘जिनोम सिक्वेंसिंग कॉम्बिनेशन’ सीजीजी-सीजीजी हे नैसर्गिकरित्या विकसित होऊच शकत नाही, असा या संशोधकांचा दावा आहे. याआधीही युरोपिय देशांमधील काही संशोधकांनी अशाच स्वरुपाचे दावे करून चीनवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे कोरोना वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरविण्यात आलेला नाही, हा दावा मागे पडला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना पसरविणार्‍या चीनकडून सुमारे दहा ट्रिलियन डॉलर्स वसूल करण्याची मागणी केली होती. पण चीनने ही मागणी धुडकावून लावली आहे. आम्ही कुणालाही नुकसानभरपाई देणार नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

leave a reply