जगभरातील प्रमुख देशांकडून भारताला सहाय्य पुरविण्याची तयारी

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फैलाव भारतात भयावहरित्या वाढत असताना, जगभरातील प्रमुख देशांचे सहाय्य भारतापर्यंत पोहचू लागले आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी फोन करून भारताच्या पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली व संपूर्ण सहकार्याचे आश्‍वासन दिले. भारताला भेडसावत असलेली ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेऊन ब्रिटनने ऑक्सिजनची संयंत्रे व इतर सहाय्य पुरविण्याची तयारी केली आहे. फ्रान्स तसेच ऑस्ट्रेलिया या देशांनी ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स पाठविण्याची घोषणा केली आहे. प्रमुख देश भारताला हे सहकार्य करीत असताना, चीनने मात्र भारताला पाठविण्यात येणारे सहाय्य रोखण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्याशी फोनवरून चर्चा पार पडली. भारतात कोरोनाची साथ फैलावत असताना, या साथीचा एकजुटीने मुकाबला करण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी विश्‍वासार्ह पुरवठा साखळी, अत्याधुनिक साहित्य व तंत्रज्ञान यांचा पुरवठा हे मुद्दे या चर्चेत अग्रस्थानी होते. याच्या बरोबरीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांचा निर्धारही पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी या चर्चेत व्यक्त केला. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे वृत्त आहे.

एकाच दिवसापूर्वी भारतातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी ब्रिटनने आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा झाली आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली. याबरोबरच जयशंकर यांची संयुक्त अरब अमिरीताचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नह्यान यांच्याशी फोनवर चर्चा झाली. भारतासमोर कोरोनाचे संकट खडे ठाकलेले असताना, संयुक्त अरब अमिरातीचे सहकार्य व पाठिंबा यासाठी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आभार मानले आहेत.

ऑस्ट्रेलियाने देखील भारताला कोरोनाच्या साथीचा सामना करीत असताना लागणार्‍या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स या साहित्याचा पुरवठ्याची घोषणा केली आहे. भारताला ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे व ऑस्ट्रेलियन सरकार याच्या पुरवठ्यासाठी आवश्यक त्या हालचाली करीत आहे, असे ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री गे्रग हंट यांनी म्हटले आहे. जगभरातील प्रमुख देश भारताला या आघाडीवर आवश्यक असलेले सहाय्य पुरविण्याची घोषणा करीत असताना, चीनने देखील भारताला सहाय्याचा प्रस्ताव दिला होता.

चीनची सरकारी विमानसेवा कंपनी असलेल्या सिचुआन एअरलाईन्समधून भारताने मागणी केलेले साहित्य रोखून धरले आहे. सिचुआन एअरलाईन्सने ऐनवळी भारताबरोबरील आपली कार्गो सर्व्हिस अर्थात मालवाहतूक बंद केली. त्यामुळे चीनकडे मागणी केलेले हे साहित्य भारतात पोहचू शकले नाही. हे सहाय्य नसून आर्थिक व्यवहार होता, पण तो देखील चीनने पूर्ण होऊ दिलेला नाही. त्यामुळे चीनकडून भारताला दिला जाणारा सहाय्याचा प्रस्ताव पोकळ होता, हे सिद्ध झाले आहे. सध्या भारत व चीन यांच्यातील तणाव लक्षात घेता, चीनच्या सरकारी कंपनीकडून घेण्यात आलेला हा निर्णय राजकीय स्वरुपाचा असल्याची चिन्हे दिसत आहेत.

leave a reply