अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसेल

- अर्थतज्ज्ञ व विश्‍लेषकांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेतील ग्राहकांची क्रयशक्ती घटल्याची माहिती समोर आली असून हाच कल कायम राहिल्यास अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसू शकतो, असे अर्थतज्ज्ञांनी बजावले आहे. डेव्हिड ब्लँकफ्लॉवर व ऍलेक्स ब्रायसन या अर्थतज्ज्ञांनी यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल प्रसिद्ध होत असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व ‘गोल्डमन सॅक्स’ने अमेरिकेच्या विकासदरात घट होण्याचे भाकित वर्तविले. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील रोजगाराच्या संधींमध्ये घट झाल्याचेही उघड झाले आहे. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेसह अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांना मंदीचा फटका बसला होता. गेल्या वर्षी बसलेल्या फटक्यानंतर अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येण्याचे संकेत मिळाले होते. सरकारने मोठ्या प्रमाणात जाहीर केलेले अर्थसहाय्य व इतर तरतुदी त्यामागील प्रमुख कारण ठरले होते. यातील काही तरतुदी आता मागे घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत.

अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसेल - अर्थतज्ज्ञ व विश्‍लेषकांचा इशाराडेव्हिड ब्लँकफ्लॉवर व ऍलेक्स ब्रायसन या अर्थतज्ज्ञांनी अमेरिकी ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता व अपेक्षा यांच्या आधारावर नव्या मंदीचे भाकित वर्तविले आहे. यासाठी ‘द कॉन्फरन्स बोर्ड’ हा अभ्यासगट व मिशिगन विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या ग्राहक निर्देशांकांचा आधार घेण्यात आला आहे. यापूर्वीही या संस्थांकडून प्रसिद्ध झालेल्या माहितीवर आधारलेले अंदाज खरे ठरले होते, असे ब्लँकफ्लॉवर व ब्रायसन यांनी म्हटले आहे.

गेल्या सहा महिन्यात अमेरिकेतील नागरिकांची खरेदी करण्याची क्षमता घटत चालल्याचे दोन्ही अर्थतज्ज्ञांनी नमूद केले आहे. ‘द कॉन्फरन्स बोर्ड’ने सादर केलेल्या माहितीत गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यानंतर ग्राहकांची अपेक्षा व क्षमता घटत असून सप्टेंबर महिन्यात नीचांकी पातळी गाठल्याचे सांगण्यात आले. तर मिशिगन विद्यापीठाने दिलेल्या माहितीत ‘कन्झ्युमर इंडेक्स’ अवघ्या दोन महिन्यांमध्ये १८ अंकांनी घसरल्याकडे लक्ष वेधले आहे.

रोजगाराच्या संधी कमी होणे व बेकारी वाढणे हे दोन घटकही मंदीचे संकेत देणारे आहेत, असे ब्लँकफ्लॉवर व ब्रायसन यांनी स्पष्ट केले. या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकी अर्थव्यवस्था मंदीत गेल्याचे दिसेल, असा दावा दोन्ही अर्थतज्ज्ञांनी केला.अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसेल - अर्थतज्ज्ञ व विश्‍लेषकांचा इशारा

हा दावा समोर येत असतानाच, ‘बिझनेस इनसायडर’ या वेबसाईटने अमेरिकी अर्थव्यवस्थेत १९७० सालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली. महागाईत वाढ व आर्थिक विकास थांबणे, अशी परिस्थिती आता पुन्हा उद्भवू शकते याकडे वेबसाईटने लक्ष वेधले. अमेरिकी कंपन्यांच्या अहवालात विविध विश्‍लेषकांकडून याची नोंद घेण्यात येत असल्याचा दावाही लेखात करण्यात आला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच ‘गोल्डमन सॅक्स’ या अर्थसंस्थांनी अमेरिकेच्या विकासदरात घट होईल, असे भाकित वर्तविले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यापूर्वीच्या अंदाजाच्या तुलनेत अमेरिकी अर्थव्यवस्थेचा विकास दर एक टक्क्याने कमी होईल, असे सांगितले आहे.

leave a reply