निर्वासितांच्या लोंढ्यामुळे स्वीडनच्या समाजात रानटीपणाचा शिरकाव झाला

- स्वीडिश संसद सदस्याचा घणाघाती आरोप

रानटीपणाचा शिरकावस्टॉकहोम – निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे स्वीडनमध्ये संघटित गुन्हेगारी व गँगवॉरला बळ मिळत असून स्वीडिश समाजात रानटीपणाचा शिरकाव झाला आहे, असा घणाघाती आरोप संसद सदस्य ऍडम मार्टिनेन यांनी केला. मार्टिनेन यांनी स्वीडनच्या एका ऑनलाईन दैनिकात ‘इमिग्रेशन क्रिएटेड बार्बारिझम्’ नावाचा लेख लिहिला असून निर्वासितांबाबत स्वीडनच्या सरकारने स्वीकारलेल्या धोरणांवर खरमरीत टीकास्त्र सोडले आहे. काही दिवसांपूर्वीच स्वीडिश यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, देशातील गुन्ह्यांमध्ये निर्वासितांचे प्रमाण अधिक असल्याचे जाहीर केले होते.

काही वर्षांपूर्वी स्वीडनचे माजी पंतप्रधान फ्रेडरिक रेनफेल्ट यांनी, ‘रानटी क्रौर्य’ हा स्वीडीश समाजाचा मूळ भाग आहे व बाकी सर्व विकास बाहेरून आलेल्या गटांमुळे झाल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते. हे वक्तव्य व स्वीडनमधील गुन्हेगारीचा अहवाल यांची सांगड घालत, ‘स्वीडन डेमोक्रॅट्स’ पक्षाचे संसद सदस्य ऍडम मार्टिनेन यांनी सरकारच्या धोरणांविरोधात आक्रमक टीका केली आहे. ‘रानटीपणा हा स्वीडनच्या समाजाचा भाग कधीच नव्हता. पण रेनफेल्ट व त्यांच्यानंतर आलेल्या राजवटींनी निर्वासितांचे अनियंत्रित लोंढे व त्यातून भडकलेल्या हिंसाचाराच्या माध्यमातून रानटीपणाचा पाया घातला’, अशा शब्दात मार्टिनेन यांनी सरकारच्या निर्वासितांसंदर्भातील धोरणांवर कोरडे ओढले.

रानटीपणाचा शिरकाव‘गेली अनेक दशके स्वीडन हा युरोपात सर्वाधिक निर्वासित स्वीकारणार्‍या देशांपैकी एक देश आहे. स्वीडन डेमोक्रॅट्स पक्षासाठी ही नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. निर्वासितांसंदर्भातील उदार धोरणांमुळे स्वीडीश समाजाच्या इतर क्षेत्रांमध्ये तीव्र परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. निर्वासितांमुळे बहुसांस्कृतिकता, गुंतवणूक व इतर लाभ मिळतील असे चित्र उभे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात वाढती बेकारी, विभक्त समाज व गुन्हेगारी टोळ्यांची संस्कृती याच गोष्टींना बळ मिळाले आहे. गेल्या आठ महिन्यात देशभरात हिंसक गुन्हेगारीच्या १९२ घटना घडल्या असून टोळीयुद्धात २६ जणांचा बळी गेला आहे’, या शब्दात मार्टिनेन यांनी निर्वासितांमुळे स्वीडनमधील बिघडत्या स्थितीकडे लक्ष वेधले.

हे भयावह चित्र बदलायचे असेल, तर स्वीडनचे निर्वासितांसंदर्भातील तसेच गुन्हेगारीबाबतचे धोरण पूर्णपणे बदलावे लागेल, असा दावा संसद सदस्यांनी केला आहे. निर्वासितांचे लोंढे स्वीकारण्यावर पूर्णपणे बंदी घालून, गुन्हेगारांना अधिक कठोर शिक्षा देण्याची गरज आहे, अशी मागणीही त्यांनी केली. स्वीडनची लोकसंख्या सुमारे एक कोटींहून अधिक असून त्यात २५ टक्क्यांहून अधिक नागरिक परदेशी वंशाचे आहेत. १९९५ ते २०१७ या कालावधीत स्वीडनमध्ये जवळपास १८ लाख निर्वासित दाखल झाल्याचे सांगण्यात येेते. २०१५ या एका वर्षात स्वीडनने १ लाख, ६० हजारांहून अधिक निर्वासितांना आश्रय दिल्याचे समोर आले होते.

leave a reply