जम्मू-कश्मीरमधील गोरखा समुदायाला रहिवाशी दाखले

Jammu-Kashmir-Gorkhaश्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या नव्या ‘डोमिसाईल’ कायद्यानुसार गेल्या आठवडाभरात ६६०० जणांना रहिवाशी दाखला देण्यात आला. यातील बहुतांश जण हे भारतीय लष्करातून निवृत्त गोरखा सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. तसेच वाल्मिकी समुदायाच्या नागरिकांनाही ‘डोमिसाईल’ मिळाले आहे. गोरखा समुदाय गेल्या दीडशे वर्षांपासून काश्मीरमध्ये वास्तव्य करून आहे. तसेच वाल्मिकी समुदायाच्या वस्त्याही गेली ७० वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. मात्र या नागरिकांना आतापर्यंत जम्मू-काश्मीरचे रहिवाशी मानण्यात येत नव्हते. त्यामुळे या नागरिकांना येथे मालमत्ता खरेदी करण्याचा आणि जम्मू-काश्मीरमध्ये नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याचा अधिकार नव्हता. मात्र आता नव्या डोमिसाईल कायद्यामुळे या दोन्ही समाजाला न्याय मिळाला आहे.

मार्च महिन्यात जम्मू-कश्मीरमध्ये नवा ‘डोमिसाईल’ कायदा लागू झाल्यापासून २५ हजाराहून अधिक जणांना या नव्या कायद्यानुसार रहिवाशी दाखला मिळाल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले होते. जम्मू-काश्मीरमध्ये कित्येक वर्ष राहत असूनसुद्धा गोरखा, वाल्मिकी समाजातील नागरिकांसह हजारो जणांना येथील रहिवाशी मानण्यात येत नव्हते. यासाठी जम्मू-काश्मीरला कलम ३७० अंतर्गत दिला गेलेला विशेष दर्जा आणि त्याअंतर्गत असलेल्या तरतुदी कारणीभूत होत्या. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने हे कलम हटवून या सर्व नागरिकांना न्याय देण्याचा मार्ग मोकळा केला होता. मार्च महिन्यात सरकारने नवे ‘डोमिसाईल’ नियम जम्मू-कश्मीरमध्ये लागू केले. यामुळे सरकारच्या निर्णयामुळे गोरखा समुदायाचा निवासी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा लढा अखेर संपला होते.

Jammu-Kashmirजम्मू-कश्मीरमध्ये ‘डोमिसाईल सर्टिफिकीट” साठी मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे ३३ हजार अर्ज आले आहेत. दररोज सरासरी २०० अर्ज प्राप्त होत आहेत. तसेच अर्ज आल्यावर कागदपत्रांची खात्री करून १५ दिवसांच्या आत रहिवाशी दाखला देण्याचे नियम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना हे रहिवाशी दाखले वेगाने मिळत आहेत. गेल्या आठवड्यातच ६६०० जणांना ‘डोमिसाईल’ मिळाले आहे. यामध्ये बहुतांश जण हे गोरखा समुदायाचे आहेत. जम्मू भागातून ५९०० जाणांना आणि काश्मीर विभागातून ७०० जाणांना ‘डोमिसाईल’ देण्यात आले. त्यातील बहुतेक गोरखा सैनिक आणि अधिकारी असल्याचे जम्मूचे अतिरिक्त उपायुक्त (महसूल) विजय कुमार शर्मा म्हणाले.

‘बाहु तहसीलमधील गोरखा समुदायातील सुमारे २५०० जणांनी भारतीय लष्करात सेवा बजावली असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. बाहु तहसीलमधून सुमारे ३५०० नागरिकांनी ‘डोमिसाईल सर्टिफिकीट” साठी अर्ज केले होते. तसेच १९५७ मध्ये पंजाबमधून वाल्मिकी समुदायाचे नागरिक येथे स्थायिक झाले होते. गेल्या आठवडाभरात ‘डोमिसाईल’ मिळालेल्यांमध्ये वाल्मिकी समाजातील नागरिकांचाही समावेश आहे, अशी माहितीही शर्मा यांनी दिली.

leave a reply