महाराष्ट्रातील निर्बंधामध्ये 15 जूनपर्यंत वाढ – काही जिल्ह्यात निर्बंध अधिक कडक करणार

मुंबई – रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 18 हजार 600 नवे रुग्ण आढळले, तर 402 रुग्णांचा मृत्यू झाला. 16 मार्चनंतरही एकादिवसात आढळलेली कोरोनाच्या नव्या रुग्णांची ही सर्वांत कमी संख्या आहे. तीन आठवड्यांपूर्वीपर्यंत राज्यात दिवसाला 50 हजाराहून अधिक रुग्ण आढळत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती आता खूपच सुधारल्याचे चित्र दिसत असले, तरी अजूनही राज्यातील पॉझिटिव्ह दर जास्त आहे. त्यामुळे राज्य सरकारने संचार निर्बंधांमध्ये 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्बंध अधिक कडकमहाराष्ट्रात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार उडविला. एप्रिल महिन्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 7 लाखांवर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणावर ताण वाढला होता. आता या लाटेने शिखर गाठून नव्या रुग्ण सापडण्याची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. मात्र तरीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमाणाची स्थिती कमी झालेली नाही. अजूनही दिवसाला 20 हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळत असून दरदिवशी सुमारे 500 जण दगावत आहेत. मे महिन्यात आतापर्यंत 25 हजार जण कोरोनाने दगावले आहेत. यामध्ये पुण्यात सर्वाधिक 2 हजार 661 रुग्ण दगावले आहेत. तसेच महाराष्ट्रात अजूनही दोन लाख 71 हजाराहून अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.

ही स्थिती पाहता राज्य सरकारने संचारनिर्बंधांचा कालावधी 15 दिवसाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आवश्यक त्या प्रमाणात अजूनही नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. उलट काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे संचारनिर्बंधांचा कालावधी पंधरा दिवसाने वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याने तेथे निर्बंध आणखी कडक करण्यात येतील. मात्र जेथे रुग्ण संख्या कमी झाली आहे, अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच जून महिन्यात लसींचे उत्पादन वाढून लस अधिक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने लसीकरणाचा वेग वाढेल. 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण वेग पकडेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

leave a reply