पाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे

- लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसचे संकट असतानाही काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न कमी झालेले नाहीत. सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या तळावर मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु आहेत. एप्रिलच्या सुरुवातीलाच येथील केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न जवानांनी उधळून लावला होता. या भागात अजूनही मोठ्या प्रमाणावर बर्फ असून येथून घुसखोरी करणे पाकिस्तानच्या लष्कराच्या साहाय्याशिवाय अशक्य आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसविण्यासाठी पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानच्या या कारवायांना भारतीय लष्कराकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात असून नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराचे वर्चस्व कायम आहे, असे जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले.

गेल्याच आठवड्यात लष्कर प्रमुख नरवणे यांनी जम्मू काश्मीरचा दौरा कला होता. इथल्या सीमा चौक्यांना भेट देऊन लष्कराच्या तयारीचाही आढावा घेतला होता. त्यानंतर संकटाच्या काळात भारत औषधांची, तर पाकिस्तान दहशतवाद्यांची निर्यात करीत आहे, असा टोला लष्करप्रमुखांनी लगावला होता. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी पुन्हा एकदा सीमेवरील पाकिस्तानच्या कारवायांकडे लक्ष वेधले.

”कोरोनाव्हायरसच्या साथीचा पाकिस्तानच्या कुटील कारवायांवर जरासुद्धा परिणाम झालेला नाही. काश्मीरमधील दहशतवादी संघटनांमध्ये होणारी स्थानिकांची भरती कमी झाली आहे आणि काश्मीरमध्ये सध्या होणाऱ्या बहुतांश दहशतवादी कारवाया या सीमेपलीकडून झालेल्या घुसखोरीशी संबंधित आहेत. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तान सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. सीमेवर पाकिस्तानकडून होणारा गोळीबार, घुसखोरी आणि इतर शेजारी देशातून भारतात दहशतवादी पाठविण्याचे प्रयत्न याचाच भाग ठरतो. मात्र पाकिस्तानला यामध्ये यश मिळू देणार नाही”, अशी ग्वाही लष्करप्रमुखांनी दिली.

”सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्याकडे लष्कर पूर्णपणे सतर्क आहे. त्याचबरोबर कोरोनाव्हायरसपासून जवानांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना हाती गेल्या आहेत. या साथीच्या संकटाबरोबर दहशतवादाविरोधात लढाई सुरु आहे. यावेळी दहशतवाद्यांवर दबाव वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी लष्कराच्या मोहिमा सुरु आहेत”, असे लष्करप्रमुख जनरल नरवणे म्हणाले.

दरम्यान, बुधवारी काश्मीरमध्ये लष्कर आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या वर्षात आतापर्यंत ५० हून अधिक दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले आहे. एप्रिल महिन्यातच १५ पेक्षा जास्त दहशवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

leave a reply