अमेरिका व चीनमधील वाढत्या तणावामुळे ‘तैवान युद्धा’ची ठिणगी उडू शकते

- अधिकारी व विश्लेषकांचा दावा

बीजिंग/तैपेई – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लष्करी हालचालींमुळे अमेरिका व चीनमधील तणाव सातत्याने वाढत असून, या तणावामुळे तैवान मुद्द्यावरून युद्धाची ठिणगी उडू शकते, असा दावा वरिष्ठ अधिकारी व विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. चीनकडून साउथ चायना सी सागरी क्षेत्रात सातत्याने सुरू असलेले लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन, अमेरिकेकडून तैवानला करण्यात येणारे संरक्षणसहाय्य आणि तैवानच्या राजवटीकडून चीनविरोधात घेण्यात येणारी आक्रमक भूमिका यामुळे युद्धाची शक्यता अधिक बळावल्याचे अधिकारी व विश्लेषकांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवरच, रविवारी अमेरिकेच्या विनाशिकेने तैवानच्या खाडीतून गस्त घातल्याची माहिती, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.

अमेरिका व चीन

चीन आपल्या सागरी क्षेत्रातील तीन वेगवेगळ्या भागात एकाचवेळी सराव करीत आहे. एकाच वेळी तीन दिशांनी शत्रूचा हल्ला होऊ शकतो ही बाब ध्यानात ठेवून हे सराव सुरू आहेत. अमेरिका, जपान व तैवानकडून चीनवर होऊ शकणाऱ्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही तयारी असू शकते. इतिहासात पाहिले तर अशा प्रकारचे सातत्याने होणारे सराव युद्धाचे स्पष्ट संकेत देतात’, असा दावा चीनच्या शांघाय यूनिव्हर्सिटीमधील लष्करी विश्लेषक नी लेशीओंग यांनी केला. चीनच्या परराष्ट्र विभागाने तैवानबाबत नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एक निवेदनात, चीनपासून तैवान वेगळा करण्याच्या कोणत्याही प्रकारच्या हालचालींना रोखण्याची क्षमता चीनकडे आहे, असे बजावले होते.

अमेरिकेसह तैवानमधील अधिकारी व विश्लेषकही युद्ध भडकण्याची शक्यता अधिक वाढल्याची जाणीव करून देत आहेत. ‘दोन्ही बाजूंना युद्ध सुरू करण्याची इच्छा नाही. मात्र त्याचवेळी लष्करी सराव व हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यातून अपघाताने युद्धाचा भडका उडण्याची शक्यता जास्त आहे’, अशी भीती एका परदेशी राजनैतिक अधिकाऱ्याने व्यक्त केली. तैवानमधील सुरक्षा तसेच राजनैतिक क्षेत्राशी संबंधित सूत्रांनीही याला दुजोरा दिला. बंदूक साफ करीत असताना एखादी गोळी सुटण्याची शक्यता जशी नाकारता येत नाही, तशीच शक्यता चीन व तैवानमधील युद्धाबाबतही असु शकते, दावा सूत्रांनी केला आहे.

अमेरिका व चीन‘यूएस नेव्हल इन्स्टिट्यूट’च्या ‘प्रोसिडिंग्ज’ या मासिकात यासंदर्भात एक लेखही प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक वादग्रस्त ठरल्यास त्या वादाचा फायदा उचलून चीन तैवानवर हल्ला चढवू शकतो, अशी शक्यता या लेखात वर्तविण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चीनविरोधात आक्रमक निर्णय घेत असून, त्यातून निर्माण झालेली अस्थिरतादेखील हल्ल्याचे कारण ठरू शकते असा उल्लेखही लेखात करण्यात आला आहे. अमेरिकेच्या संरक्षणदलातील माजी वरिष्ठ अधिकारी जेम्स विनफेल्ड व गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी संचालक मायकल मॉरेल यांनी हा लेख लिहिला आहे.

दरम्यान, रविवारी अमेरिकी नौदलाच्या विनाशिकेने तैवानच्या आखातातून गस्त घातल्याचे समोर आले आहे. तैवानच्या संरक्षणमंत्रालयाने सोमवारी याची माहिती दिली असून, ही गस्त नियमित सागरी मोहिमेचा भाग होती असे म्हटले आहे. अमेरिकेच्या विनाशिकेने तैवाननजिक गस्त घालण्याची गेल्या १५ दिवसातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या ‘गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर युएसएस मस्टिन’ने तैवानच्या आखातातून गस्त घातली होती. अमेरिकी विनाशिकेची गस्त चिथावणीखोर व धोकादायक असल्याची टीका चीनने केली होती.

leave a reply