इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ले – इराणने अमेरिकेला धमकावले

बगदाद – कोरोनाव्हायरसने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतलेले असताना, इराकमधील हालचालींनी वेग धरला आहे. काही तासांपूर्वी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ले झाले. दोन दिवसांपूर्वी इराकमध्ये तैनात केलेल्या अमेरिकेच्या ‘पट्रियॉट’ या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने हे हल्ले यशस्वीरित्या भेदल्याचे दावे केले जातात. दरम्यान, या हल्ल्यानंतर पुढील काही तासात इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’नी अमेरिकेला इशारा दिला.

अमेरिकेच्या लष्करातील प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा ‘पॅट्रियॉट’ सोमवारी इराकमध्ये दाखल झाली. या यंत्रणेची बॅटरी इराकच्या ‘एन अल-असाद’ ‘ तळावर तैनात केली आहे. याच तळावर मंगळवारी रॉकेट हल्ले झाल्याची माहिती इराकी लष्कराच्या सूत्रांनी माध्यमांना दिली. पण काही तासांपूर्वी तैनात झालेल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने हे हल्ले यशस्वीरित्या भेदले, अशी माहिती इराकी लष्कराच्या सूत्रांनी दिली.

इराकमध्ये तैनात अमेरिकेच्या लष्कराची यावर प्रतिक्रिया आलेली नाही. याआधी येथील अमेरिका आणि नाटो देशांच्या लष्करी तळावर झालेल्या रॉकेट हल्ल्यांसाठी इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. तसेच, आपल्या लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्तुत्तर म्हणून अमेरिकेने या इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवर हल्ले चढविले होते.

अमेरिकेकडून या कारवाईची शक्यता लक्षात घेऊन, इराणमधील ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने (आयआरजीसी) अमेरिकेला धमकावले आहे. ‘अमेरिकेने इराण किंवा इराकमधील इराणसंलग्न गटांवर हल्ले चढविले, तर ती अमेरिकेची शेवटची चूक ठरेल’, अशी धमकी ‘आयआरजीसी’ने दिली.

इराकमधील इराणसंलग्न ‘कतैब हिजबुल्लाह’ या दहशतवादी संघटनेने देखील अमेरिकेला इशारा दिला. अमेरिकेची इराकमधील सैन्यतैनाती बेकायदेशीररित्या असल्याचा आरोप कतैबने केला. त्यामुळे बेकायदेशीररित्या आपल्या देशात तळ ठोकणार्या अमेरिकी लष्कराविरोधात उठाव करण्याचा इराकी जनतेला पूर्ण अधिकार असल्याचा दावा ‘कतैब’ने केला आहे.

leave a reply