सिरियातील ‘आयएस’च्या १८० ठिकाणांवर रशियाचे हवाई हल्ले

- दहशतवाद्यांनी सिरियातील घातपातांची तीव्रता वाढविली

मॉस्को/दमास्कस – रशियन लष्कराने सिरियातील ‘आयएस’विरोधी कारवाई तीव्र केली आहे. गेल्या दोन दिवसात रशियन लढाऊ विमानांनी सिरियाच्या राक्का, देर अल-झोर आणि होम्स भागातील आयएसच्या किमान १८० ठिकाणांवर हल्ले चढविले आहेत. सिरियातील मानवाधिकार संघटनेने ही माहिती दिली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सिरियन लष्कर आणि जनतेवरील बॉम्बहल्ले वाढविल्याच्या बातम्या येत आहेत.

सिरियातील ‘आयएस’च्या १८० ठिकाणांवर रशियाचे हवाई हल्ले - दहशतवाद्यांनी सिरियातील घातपातांची तीव्रता वाढविलीसिरियाच्या हेमिम येथील हवाईतळावर तैनात रशियाच्या लढाऊ विमानांनी शनिवार, रविवार असे सलग दोन दिवस आयएसच्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढविले. यामध्येसिरियाच्या दक्षिणेकडील बादिया वाळवंटातील दहशतवाद्यांच्या तळांचा समावेश आहे. तसेच राक्का व देर अल-झोर प्रांताच्या सीमेवरील ‘जबाल अल-बिशरी’ व हमा प्रांताच्या अथरिया भागातही आयएसच्या ठिकाणांवर रशियन विमानांनी हल्ले चढविले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याचे मानवाधिकार संघटना सांगत आहेत. मात्र रशियाने याचे तपशील प्रसिद्ध केलेले नाहीत.

या महिन्यात रशिया व सिरियन लष्कराच्या आघाडीने दहशतवाद्यांवर केलेली ही दुसरी मोठी कारवाई ठरते. रशिया व सिरियन लष्कराच्या आघाडीविरोधात दहशतवाद्यांनी प्रतिहल्ले चढविले आहेत. सिरियाच्या इदलिब भागात दहशतवाद्यांनी सिरियन लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केल्याच्या बातम्या येत आहेत. यामध्ये तीन सिरियन जवानांचा बळी गेला तर चार जण जखमी झाल्याचा दावा केला जातो. अल कायदाशी संलग्न असलेल्या ‘जबात अल-नुस्र’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘जबात’ने आपण इदलिब, लताकिया, अलेप्पो आणि हमा प्रांतात ३९ दहशतवादी हल्ले घडविल्याची माहिती दिली.

तर सिरियातील एका वर्तमानपत्राने अलेप्पो प्रांतात कारबॉम्बस्फोट झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात तुर्कीसंलग्न फ्रि सिरियन आर्मीचे सहा दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जातो. पण सिरियन लष्कर तसेच सरकारी वृत्तवाहिनीने या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. सिरियात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सोमवारपासून सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत, सिरियामध्ये हल्ले वाढवून अस्थैर्य निर्माण करण्याचे कारस्थान व हे कारस्थान उधळण्याचे डावपेच आक्रमकपणे राबविले जात असल्याचे दिसते.

दरम्यान, गेल्या वर्षभरात सिरियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सिरियन लष्कर व संलग्न गटांचे १,४२३ जवान ठार झाल्याचा दावा स्थानिक मानवाधिकार संघटना करीत आहेत. यामध्ये दोन रशियन तर इराणसंलग्न गटांचे १४९ जवान तसेच दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे बोलले जाते.

leave a reply