रशियाच्या १८ राजनैतिक अधिकार्‍यांची झेक प्रजासत्ताककडून हकालपट्टी

प्राग – अमेरिकेने आपल्या राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केल्यानंतर, दहा अमेरिकन राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी करून त्याला रशियाने प्रत्युत्तर दिले होते. दोन्ही देशांमधला हा तणाव वाढत असताना, नाटो व युरोपिय महासंघाचा सदस्यदेश असलेल्या ‘झेक प्रजासत्ताक’ने १८ रशियन राजनैतिक अधिकार्‍यांना ४८ तासात आपला देश सोडून जाण्याचे आदेश दिले. झेक प्रजासत्ताक हे सारे अमेरिकेला खूश करण्यासाठी करीत आहे, पण यानंतर काय होईल, याची या देशाला कल्पना आहे, असा टोला रशियन परराष्ट्र मंत्रालयाने लगावला आहे.

२०१४ सालच्या ऑक्टोबर महिन्यात झेक प्रजासत्ताकाच्या लष्करी कोठारात भीषण बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात दोन जणांचा बळी गेला होता. या स्फोटामागे रशिया असून यात रशियन गुप्तचर संस्था गुंतलेली असल्याचा संशय बळावला आहे. म्हणूनच झेक प्रजासत्ताकाने १८ रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे या देशाचे पंतप्रधान आंद्रेज बाबिस यांनी जाहीर केले. हा धाडसी निर्णय घेऊन झेक प्रजासत्ताकने रशियाला फार मोठी चिथावणी दिली आहे, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून केला जातो. या वादात अमेरिकेनेही उडी घेतल्याचे दिसत आहे.

झेक प्रजासत्ताकमधील अमेरिकन दूतावासाने अमेरिकेला निकटतम मित्रदेश असलेल्या झेक प्रजासत्ताकला पाठिंबा जाहीर केला आहे. आपल्या देशातील रशियाच्या घातक कारवाया रोखण्यासाठी झेक प्रजासत्ताक करीत असलेल्या प्रयत्नांना अमेरिकेचे संपूर्ण समर्थन असेल, असे अमेरिकी दूतावासाने स्पष्ट केले. रशियाने अमेरिकेच्या १० राजनैतिक अधिकार्‍यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतल्यानंतर, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले होते. झेक प्रजासत्ताककडून रशियाच्या विरोधात करण्यात आलेली कारवाई हा त्याचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

झेक प्रजासत्ताकाच्या या निर्णयामागे अमेरिका आहे, हे उघड आहे. पण यानंतर काय होऊ शकते, याचीही या देशाला नक्कीच जाणीव असेल, अशा नेमक्या शब्दात रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झकारोव्हा यांनी आपल्या देशाची प्रतिक्रिया नोंदविली. याबरोबरच संतापलेला रशिया झेक प्रजासत्ताकातील आपला दूतावास बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे दावे केले जात आहेत. यामुळे १९८९ साली सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर, पहिल्यांदाच रशिया व झेक प्रजासत्ताकमध्ये इतका पराकोटीचा तणाव निर्माण झाल्याचे दावे आंतरराष्ट्रीय माध्यमे करू लागली आहेत.

युक्रेनच्या प्रश्‍नावर रशिया आक्रमक भूमिका स्वीकारत असताना, नाटो व युरोपिय महासंघाचा सदस्य असलेल्या झेक प्रजासत्ताककडून नवी राजनैतिक आघाडी उघडून अमेरिकेने रशियावरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे यामुळे समोर येत आहे. मात्र अमेरिका व रशियामधील या तणावाचे गंभीर परिणाम समोर येतील, असा इशारा काही अमेरिकन नेत्यांकडून दिले जात आहेत.

युक्रेनच्या प्रश्‍नावर आपण रशियाबरोबर वंशसंहार घडविणारे अणुयुद्ध खेळण्यास तयार आहोत, असा निर्णय अमेरिकन नेतृत्त्वाने घेतलेला आहे का? असा सवाल अमेरिकन संसदेच्या माजी सदस्य तुलसी गबार्ड यांनी केला आहे. तसे नसेल तर मग अमेरिकन नेत्यांनी शक्तीप्रदर्शन व हवेतील तलवारबाजी थांबवून रशियाबरोबरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा टोला तुलसी गबार्ड यांनी लगावला आहे.

leave a reply